

– खिचडी ऐवजी मिळणार कडधान्ये, मिलेट्स, भाज्या व फळे
– पहिल्यांदाच झाली पाककृती समिती गठीत
– नागपूरचे शेफ विष्णू मनोहर यांचा समितीच्या अध्यक्षस्थानी
विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स (BMI) कमी किंवा जास्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात खिचडी ऐवजी स्थानिक पातळीवर उत्पादित कडधान्ये, बाजरी आदी मिलेट्स, भाज्या आणि फळे यांचा समावेश करण्याची शिफारस नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेतील पाककृती समितीने केली आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्या मार्गदर्शनात ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील ही आठ सदस्यीय राज्य-नियुक्त समिती विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी राज्याच्या मध्यान्ह भोजन मेनूमध्ये सुधारणा सुचवणार आहे. समितीने मेनूमध्ये स्थानिक पदार्थ, तृणधान्ये, अंकुर इत्यादींचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने अशा प्रकारची समिती स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्याचा मुख्य उद्देश मुलांच्या आहारात बाजरी आणि इतर पोषक तत्वांचा समावेश करणे हा आहे. गुरुवारी एक सरकारी ठराव (जीआर) जारी करण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, सध्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’ अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पाककृती 2011 मध्ये ठरवल्या गेल्या होत्या. परंतु, गेल्या काही वर्षांतील प्रसिद्ध झालेल्या अहवालांनी याकडे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) एकतर कमी किंवा जास्त आहे. केंद्र सरकारने राज्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नपदार्थ, तृणधान्ये इत्यादींचा समावेश करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
शेफ मनोहर म्हणाले की, शिक्षण मंत्री दीपक केसकर हे पहिले असे शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी जातीने लक्ष घालून शालेय शिक्षणातील पोषण आहारासारख्या महत्वाच्या विषयावर समिती स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, रुचकर आणि दर्जेदार असावे यासाठी विविध पाककृती सुचवणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून आहार विद्यार्थ्यांचा बीएमआय सुधारू शकेल. मनोहर म्हणाले, “स्थानिक खाद्यपदार्थ आरोग्यदायी असल्याने स्थानिक भाज्या आणि फळांवर आधारित पाककृतींचा समावेश करण्यावरही समिती काम करत आहे. आम्ही विद्यार्थ्यांसाठी अन्न पर्याय समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, जे त्यांना खायला आवडतात आणि त्यात मोड आलेली कडधान्ये आणि बाजरी देखील समाविष्ट आहे. समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी आरोग्य, आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये कोल्हापूर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेश्वर, आघारकर संशोधन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, आहारतज्ज्ञ पूनम कदम, बिझनेस फेडरेशनचे कार्यकारी नितीन वाळके, पोषणतज्ज्ञ अर्चना ठोंबरे, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीचे वैभव बरेकर, पोषण शक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक आणि राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाल याचा समावेश आहे.