अहमदनगर: धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चौंडी येथे मागील पंधरवड्यापासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज धनगर नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावे, या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी यशवंत सेनेचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे. चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे माजी आमदार रामहरी रूपावर यांनी म्हटले आहे.















