‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्‍ये डेअरी क्षेत्रातील सदस्‍यांची बैठक संपन्‍न

0

नागपूर, 6 ड‍िसेंबर 2023
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या प्रेरणेतून आकाराला आलेल्‍या खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड), नागपूर यांच्यावतीने ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ हा उपक्रम राबवला जात असून त्‍या अनुषंगाने बुधवारी डेअरी क्षेत्रातील सदस्‍यांची बैठक व्‍हीआयए, उद्योग भवन, स‍िव्‍हील लाईन्‍स येथे पार पडली.
असोस‍िएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटचे अध्‍यक्ष आशीष काळे व संयोजक डॉ. मोहन श्रीगिरीवार यांच्‍या अध्‍यक्षतेत झालेल्‍या या बैठकीला विलास काटेखाये, डॉ. विजय घुगे, प्रदीप कुकडकर (माविम गोंदिया), विजय आढाव, गोपाळ वानखेडे, अनुराग पुराणिक, अभिषेक दत्तात्रेय, डॉ. सुधीर धोटे, डॉ. अस्मिता ठवकर, अमोल बरेहा यांची उपस्थिती होती.
जानेवारी मह‍िन्‍यात होणा-या खासदार औद्योग‍िक महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर डेअरी उद्योग क्षेत्रातील विविध समस्‍यांवर यावेळी चर्चा करण्‍यात आली. डेअरी विषयक सरकारी योजना, कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधीची मदत घेणे, नियोजनबद्ध प्रकल्प आखणी करणे, दुधाला चांगला भाव मिळविण्यासाठी त्याचा दर्जा सुधारणे, विविध ब्रँड सोबत टाय-अप अश्या काही उपाययोजनादेखील यावेळी चर्चिल्‍या गेल्‍या. डेअरी उद्योगाला चालना देण्‍यासाठी खासदार औद्योग‍िक महोत्‍सवात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता, त्याची वाढती किंमत, पशुखाद्य, उत्पादन खर्च कमी करणे आणि नफा वाढविणे, महिला बचत गटांचा सहभाग आणि स्वयंपूर्णता, पशुधन खरेदीसाठी पॅकेज यासंदर्भात कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्‍यासंदर्भातही बैठकीत उहापोह करण्‍यात आला.
स्थानिक दूध उत्पादनाची खरेदी व‍िभागील सर्व युनिट्सना करता यावी, या अनुषंगाने दुधाची मागणी वाढवण्याच्या दिशेने प्रयत्‍न करावे, अशी विनंती सर्व सदस्यांनी एडच्‍या पदाध‍िका-यांना केली.