

नागपूर(Nagpur)9 जुलै-भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने युवा कलाकारांद्वारे स्थापन करण्यात आलेल्या उपज संस्थेच्या वतीने “मीरा और कबीर: भक्ती से मुक्ती तक” हा संगीत-नृत्याचा कार्यक्रम शनिवार, 12 जुलै रोजी सांयकाळी ६:३० वाजता शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना आदित्य सावरकर व आर्य पुराणकर यांची आहे. संगीत संयोजन आर्य पुराणकर यांचे तर ध्वनी संयोजन रिशभ ढोमणे यांचे आहे. संत कबिर आणि मिराबाई यांच्या दोहे आणि कवितांचा भक्तिमय नजराणा यश खेर, निधी रानडे, साक्षी सरोदे हे युवा गायक कलाकार सादर करणार आहेत. शबरी पुराणिक आणि अवनी काशीकर नृत्य सादरी करतील. गायकांना प्रमोद बावणे, अरविंद उपाध्ये, अथर्व शेष, गौरव टांकसाळे, प्रविण लिहितकर, निशिकांत देशमुख, विक्रम जोशी, महेंद्र वातुळकर हे वादक कलाकार साथसंगत करणार आहे.
सूत्रसंचालन आर्य घटवाई करणार आहेत. या नि:शुल्क कार्यक्रमात प्रवेशिकांवरच प्रवेश दिला जाईल. प्रवेशिका विष्णुजी की रसोई येथून प्राप्त करता येतील. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाला मॉरीस गॅरेजेस(एमजी), गोदरेज इंटेरिओ, जीआयएम वेल्थ, स्पेसवूड, विष्णूजी की रसोई, वालोकर ज्वेलर्स, श्री सिद्धीविनायक ट्रस्ट नागपूर, बिग एफएम यांचे सहकार्य लाभत आहे.