

(Haidrabad)हैद्राबाद: एका लग्नात जेवणात मटणाची नळी न मिळाल्याने
वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी होऊन
वरपक्षाने लग्न मोडल्याचा प्रकार घडला. तेलंगणात ही धक्कादायक घटना घडली.
तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यातील वधू आणि जगतियाल जिल्ह्यातील एका दोन कुटुंबात विवाह निश्चित झाला होता. वधू वराचा साखरपुडा देखील उरकला होता. वधूच्या कुटुंबीयांनी लग्नातील पाहुण्यांसाठी मांसाहाराची व्यवस्था केली होती. मांसाहारी थाळीत मटण दिले होते.
लग्नात सर्व काही सुरळीत चालले होते. पण अचानक माशी शिंकली. जेवणामध्ये मटणाच्या नळ्या नसल्याने लग्नातील पाहुणे नाराज झाले. वराच्या ताटात देखील मटणाच्या नळ्या दिल्या नसल्याने या गोष्टीचा वराला राग आला. ही बातमी वराच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. वराच्या कुटुंबीयांनी वधूच्या कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार केली. यातून वाद वाढला. हा वाद एवढा वाढला की दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण वर पक्ष मात्र, समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मटणात नळ्या नसणे
हा आमचा अपमान आहे, अशी भूमिका वर पक्षाने घेतली. तर मटणात नळ्या होत्या, असा पवित्रा वधू पक्षाने घेतला. मात्र, एकमत न झाल्याने शेवटी नाराज वर पक्षाने हे लग्नच मोडले. लग्न न करताच वरात परतली.