

मुंबई(Mumbai), 15 जून :- महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीने लढणार आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आज जाहीर केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, आता दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येईल. मोदी सरकार हे आता एनडीएचं सरकार झालं आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीत आमच्याबाबत जे म्हटलं जायचं की, नैसर्गिक आणि अनैसर्गिक युती. मग आता दिल्लीतील युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा प्रश्न आहे. देशातील जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, त्यामुळे हे मोठं यश आहे असं मी मानतो. लोकसभा निवडणुकीत असं वातावरण होतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे जनतेचे आम्ही आभार मानतो. लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी एक लढाई होती. मला माझा अभिमान आहे, कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व नागरिकांनी इंडी आघाडी आणि महाविकास आघाडीला जो कौल दिला, त्यामुळे हा विजय झाला. पण हा विजय अंतिम नाही तर ही लढाई सुरू झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितले की, त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेले. खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत की नाही. वोट जिहाद म्हणजे काय मला कळलं नाही. आम्हाला मते दिली तर आम्ही संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. ते खरं कथानक होतं का? ४०० पारची घोषणा का दिली होती. आम्हाला मराठी मतं कमी का मिळतील. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला सर्व धर्मियांनी मतदान केले. त्यात हिंदू, मुस्लिम, शीख आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस मत देईल का? अजूनही भाजपला वास्तवाची जाणीव आली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या वास्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे हे त्यांनी आधी ठरवावं.