

नागपूर (Nagpur) – शहरातील भांडेवाडी कचरा डंपींग यार्डला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या आगीमुळे परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला आणि मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर घटनेनंतरही मनपा नागपूरच्या अधीक्षक अभियंता (प्रकल्प) सकाळपासून घटनास्थळी पोहोचू शकलेले नाहीत, ही बाब विशेष चिंतेची ठरत आहे. याशिवाय, अग्निशामक दलाच्या गाड्यांची संख्या अपुरी असल्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
भांडेवाडी परिसरात धुरामुळे श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तातडीने उपाययोजना करून आग नियंत्रणात आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.