
१३६ वर्षांच्या गोसेवेच्या परंपरेसह भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचा संदेश
नागपूर, ऑक्टोबर २०२५ :मागील १३६ वर्षांपासून गोसेवा व गोवंश संवर्धनाची परंपरा जपत असलेल्या वर्धा रोड, धंतोली येथे स्थित गोरक्षण सभा च्या वतीने यंदा २ आणि ३ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती गोरक्षण सभेचे अध्यक्ष सारंग गडकरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सन १८८८ मध्ये स्थापन झालेल्या गोरक्षण सभेचे प्रमुख उद्दिष्ट सदैव गोसेवा, गोवंशाचे रक्षण आणि समाजामध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हे राहिले आहे. ही संस्था केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही सातत्याने पुढाकार घेत आहे.
सारंग गडकरी(sarang gadkari) यांनी सांगितले की, सध्याच्या काळात लहान कुटुंबे आणि मर्यादित निवासस्थानांमुळे पारंपरिक भारतीय सणांचे सामूहिक स्वरूप कमी होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सामूहिक तुलसी विवाह उपक्रमाची कल्पना साकार करण्यात आली. याद्वारे समाजाला एकत्र आणून सांस्कृतिक परंपरा पुनरुज्जीवित करणे आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत भारतीय संस्कृतीचे मूल्य पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाअंतर्गत २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सीमंतपूजन आणि हळदीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मेहंदी, संगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे भक्तिगीते सादर करतील.
३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काली माता मंदिरापासून गोरक्षण मंदिरापर्यंत वरात मिरवणूक काढण्यात येईल आणि सायं. ६.२५ वाजता तुलसी विवाह संपन्न होईल.
या विवाह सोहळ्यात उद्योगपती बी. सी. भरतीया आणि सौ. सविता भरतीया हे वर चि. श्रीकृष्णजींचे यजमान असतील, तर उद्योगपती पराग सराफ आणि सौ. पायल सराफ या वधू चि.सौ.का. तुलसीजींच्या यजमान असतील.
गोरक्षण सभेच्या परिसरातील श्रीकृष्ण मंदिर हे सुमारे ९० वर्षे जुने असून येथे नियमितपणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मागील वर्षी प्रारंभ झालेला सामूहिक तुलसी विवाह उपक्रम आता वार्षिक परंपरेचे स्वरूप घेऊ लागला आहे.
सभा पदाधिकाऱ्यांच्या मते, गोरक्षण सभा “पंच परिवर्तन” या वैचारिक संकल्पनेनुसार कार्यरत असून हिंदू सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण व प्रसार करणे हे तिचे ध्येय आहे. तुलसी विवाहासारखे उपक्रम हा या सांस्कृतिक विचाराचा प्रसार करण्याचा एक लहान पण प्रभावी प्रयत्न आहे.

सभेने सर्व नागरीक, सामाजिक संस्था आणि गोसेवा प्रेमींना आवाहन केले आहे की त्यांनी या सामूहिक तुलसी विवाह उपक्रमात सहभागी व्हावे आणि समाजात गोसेवा, श्रद्धा व सांस्कृतिक ऐक्याचा संदेश प्रसारित करावा.
पत्रकार परिषदेत गोरक्षण सभेचे अध्यक्ष सारंग गडकरी, प्रसन्न पातुरकर, पुष्कर बुटी, मकरंद पांढरीपांडे, शिरीष भगत, हर्षल आर्विकर, ममता चिंचवडकर हे उपस्थित होते.
















