
नाशिक : वाइटातूनही चांगले काढण्याच्या उद्योजकिय मानसिकतेने या क्षेत्रातही यश मिळाले. या वाटचालीचे पुढील यश म्हणजे मराठी चित्रपटांना अमेरिकेत चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे येत्या 27 व 28 जुलैला अमेरिकेत मराठी चित्रपट महोत्सव होत आहे, अशी माहिती कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील प्रसिध्द चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अभि घोलप यांनी केले. Marathi Film Festival
गोदातीरी सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत घोलप यांनी स्व. अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यानाद्वारे ”मराठी सिनेमा- अमेरिकन ड्रीम” या विषयावर पुष्प गुंफले. अँड. हेमंत तूपे यांनी घोलप यांचा परिचय करून दिला. तर मालेचे कार्यकर्ते ऋषिकेश यांनी त्यांचे स्वागत केले. Marathi Film Festival
घोलप म्हणाले की, चित्रपटांकडे वळण्याचा माझा कल जरा गंमतशिरच आहे. 2003 मध्ये स्टार्टअप सुरू केली. 2010 मध्ये मी भारतात आलो तेव्हा या क्षेत्रातील अनेक प्रोड्यूसरनी संपर्क साधला व या क्षेत्रात येण्याची गळ घातली. त्याकाळात देऊळ आणि बालगंधर्व हे चित्रपट करण्याची संधी मिळाली. तरीही हिंमत होत नव्हती. केवळ उद्योजकतेच्या मानसिकतेतून हे धाडस केले.मात्र माहिती काहीच नव्हती. मग आणखी मोठे काही करण्याच्या उर्मीने थेट नाना पाटेकर, अजय अतुल, नितीन देसाई अशा दिग्गजांना भेटलो. त्यांच्याकडे खुप शिकायला मिळाले. तसेच अमेरिकेत स्थापन केलेल्या NAPHA (नाफा) या संस्थेच्या माध्यमातून आणखी तीन चित्रपट निर्मिती आणि मराठी चित्रपटांचे वितरण, चित्रपट महोत्सव यासारखे उपक्रम राबवीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या निमित्ताने त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रातील विविध प्रकारचे अनुभव, धमक्या, घडलेले विनोद सांगत आपला प्रवास उलगडला.
















