

जालना – विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही, मात्र नेत्यांच्या गाठीभेटी आणि निवडणूकपूर्व आघाडीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी राज्यव्यापी यात्रा सुरु केल्या आहेत. तर महायुती सरकारकडून महिला मेळाव्यांच्या निमित्ताने वातावरण निर्मिती सुरु आहे. त्यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभेसंबंधीची भूमिका 29 ऑगस्टला जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी तारीख पुढे ढकलली आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे येऊन भेट घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा फॅक्टर ठरला होता. येथील आठ पैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्ह्यात पराभव झाला आणि येथे काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीने राज्यात आणखी काही राजकीय उलटफेर होणार का, याची चर्चा आता सुरु झाली आहे.
जरांगे पाटील – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काय चर्चा
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मराठा आरक्षणासंबंधी कायदेशीर, संविधानिक बाबींचा त्यांचा अभ्यास आहे. या भेटीत मराठा आरक्षणासंबंधी चर्चा झाली असणार हे नक्की आहे. त्यासोबतच आगामी निवडणुकीसंबधीही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे प्रथमच जरांगेंच्या भेटीसाठी आले आहेत, त्यामुळेही या भेटीला वेगळे महत्त्व आहे. जरांगे आणि चव्हाण यांच्यात काय चर्चा झाली, ते अजून समोर आलेले नाही.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण मुद्याने लोकसभेत मोठा परिणाम दाखवून दिला होता. महायुतीला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. मराठवाड्यातील भावी आमदारांची तर अंतरवाली सराटीत रिघच लागलेली आहे. मनोज जरांगे हे आगामी निवडणूक लढवायची की नाही या संबंधी 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार होते. मात्र आत त्यांनी ही तारीख पुढे ढकली आहे. त्यामुळे ते खरंच उमेदवार जाहीर करणार की, कोणाला पाडा, आणि कोणाला निवडून आणा येवढाच संदेश देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.