

– ३.५० लाखाचे होते बक्षिस – अनेक नक्षल कारवायांमध्ये होता सहभाग
गोंदिया (GONDIA),
Maoist Surrender अनेक नक्षल कारवायांमध्ये सहभाग असलेल्या व ३.५० लाख रुपयांचा बक्षिस असलेला प्लाटून मेंबर जहाल नक्षल्याने सोमवार १९ मे रोजी गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवसू उर्फ देसु (मूळ नाव – देवा राजा सोडी), वय २४ रा. चीटिंगपारा/ गुंडम, पोस्ट – पामेड, पो. स्टे. तर्रेम, तालुका- उसूर, जिल्हा- बिजापूर (छ. ग.) पद – सदस्य, प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे. या अनुषंगाने माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता जिल्ह्यात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसांनी आत्मसमर्पण करीता केलेले आवाहन, माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या पिळवणूक आणि अत्याचारास कंटाळून, तसेच माओवादी संघटनेतील अतिशय कठीण वेदनामयी जीवनाला कंटाळून देवसू उर्फ देसु याने सोमवारी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचेसमक्ष आत्मसमर्पण केले.
असा झाला चळवळीत शामील…
देवसू उर्फ देसु उर्फ देवा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या – भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे लहानपणापासून तो नक्षलयांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला. त्यानंतर ऑक्टोंबर २०१७ मध्ये पामेड पी.एल. ९ मध्ये भरती झाला आणि शासनाविरुद्ध शस्त्र हाती घेतले. डिसेंबर २०१७ मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले. एप्रिल २०१८ मध्ये तो आपल्या साथीदारांसह एम. सी. सी. झोन (विस्तार एरिया) मध्ये आला.
Maoist Surrender तिथे दरेकसा, तांडा, मलाजखंड, पी.एल ३ या नक्षल दलम सोबत ८-१५ दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम. सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे (सेंट्रल कमिटी मेंबर / सद्या मृत) याचे अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला येथे नक्षल – पोलीस चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण २८ नक्षलवादी मारले गेले. या चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. तेथून माड एरिया मध्ये काम केले. त्यानंतर परत पामेड पी एल ९ मध्ये मध्ये काम केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील कारवायांमध्ये सहभाग…
माओवादी देवसू याने २०१७-२०२२ मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे. यात २०१८ मध्ये जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. असतानाच तुमडिकसा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी होता. त्याचबरोबर २०१९ या वर्षी छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील गातापार पोलीस ठाण्यांतर्गत तांडा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमक, बकोदा (कान्हा भोरमदेव एरिया) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमक व २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मर्दीनटोला जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी असल्याचे त्याने सांगितले.
वर्षभरात तीन नक्षल्यांचे आत्मसमर्पण…
गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेमुळे सन २०२४-२०२५ या वर्षात तीन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केला असून २०२४ मध्ये संजय पुनेम व देवा मुडाम या दोन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.