

“नवीन घर बांधलं होतं, आता लग्न करायचं होतं पण….”;
Kuwait:- कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहात असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४२ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत किमान ५० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या निर्देशांनुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला रवाना झाले आहेत. पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी अकस्मात मृत्यूप्रकरणी टाहो फोडला आहे.
मृतांमध्ये बहुसंख्य भारतीय नागरिक असून ते २० ते ५० वर्षे वयोगटातील असून ते खाजगी कंपनीत काम करत होते, असे अरब टाइम्सने वृत्त दिले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीत १९५ कामगार होते. या मृत कामगारांच्या नातेवाईंकांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला आहे.
४८ वर्षीय वडाक्कोट्टुविलायल लुकोस हे एनबीटीसी समूहाचे पर्यवेक्षक होते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के.जी. अब्राहम, केरळमधील व्यापारी आहेत. लुकोस हे कोल्लममधील अदिचनल्लूर पंचायतीचे रहिवासी आहेत आणि गेल्या १८ वर्षांपासून ते कुवेतमध्ये होते. “ते पुढच्या महिन्यात त्यांची मोठी मुलगी, लिडिया हिच्या कॉलेज ऍडमिशनसाठी घरी येणार होते. तिने सर्व विषयांमध्ये ए-प्लससह बारावी उत्तीर्ण केली होती. ल्युकोस यांना तिच्या निकालाचा अभिमान होता. कुवेतला जाण्यापूर्वी ते घरी आले होते”, असं पंचायतीचे सदस्य एल शाजी म्हणाले. वडाक्कोट्टुविलायल लुकोस यांच्या पश्चात त्यांची पत्नी शायनी, गृहिणी आणि दोन मुली आहेत.