

चंद्रपूर (Chandrapur) : हे होणारच होते, आज न उद्या. पण जेव्हा ते झाले तेव्हा प्रचंड धक्का बसला आणि ती धक्कादायक वार्ता होती, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान सप्रेंचे त्यांच्या सहकारनगरमधील राहत्या घरी दु:खद निधन झाले आणि एक अध्याय संपला. एक पर्व संपले. एक ज्योत निमाली. वयाच्या ९२ व्या वर्षी एक यज्ञ संपला.
४ जानेवारी १९३३ रोजी नांदुरा येथे जन्मलेल्या सप्रेंची कर्मभूमी चंद्रपूर ठरली. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या सप्रेंनी नोकरीचा राजीनामा देऊन कलासाधनेला प्रारंभ केला आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार म्हणून ते ओळखले गेले. ते केवळ व्यंगचित्रकारच नव्हते, तर काष्ठशिल्पीही होते. त्यांची काष्ठशिल्पेपण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलीत. ते उत्तम लेखकपण होते. सांजी, दहिवर, हसा की, फरसाण, रुद्राक्षी अशी त्यांची अनेक पुस्तके गाजलीत. ते उत्तम वक्तासुद्धा होते. त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोते आतूर असत. कामगार नेता म्हणून देखील त्यांची ओळख होती. निळू फुले, जयदेव हट्टगंडी, डॉ. श्रीराम लागू, पु.ल. देशपांडे अशा अनेक क्षेत्रातील थोरामोठ्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यांना चंद्रपूर भूषण पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळाले होते, ज्यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्काराचाही समावेश होता. त्यांच्या मागे मिलिंद व नितीन ही दोन मुले, पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सृजनचे आशीष देव त्यांचे मानस पुत्र होते. सृजन चंद्रपूर यू-ट्यूब चॅनेलवर त्यांची सविस्तर मुलाखत उपलब्ध आहे. एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. साऱ्याच क्षेत्रातील कलाकारांसाठी ते आधारस्तंभ होते. चंद्रपूर शहरातील जी काही मोजकी मंडळी जागतिक पातळीवर ओळखली गेली त्यात सप्रेंचाही सहभाग होता. सामाजिक, राजकीय व्यंगचित्रे काढण्यात त्यांचा हतखंडा होता. बाहेरगावावरून आलेली कलाक्षेत्रातील कोणतीही व्यक्ती त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जायची नाहीत. चंद्रपूरला वैश्विक नकाशावर घेऊन जाणाऱ्या सप्रेंचे निधन ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नाही तर समाजाची देखील हानी आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
– आशीष देव चंद्रपूर