
नागपूर NAGPUR -भारतीय लष्कराच्या Indian Army नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात- उमंग सबएरियतर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान ‘शौर्य संध्या’ या भारतीय लष्कराच्या संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केले जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शन बघायला मिळणार आहे अशी माहिती उमंग सब एरीयाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी गार्ड रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडीअर के. आनंद, रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
2 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 11: 30 पासून भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेले विविध प्रकारचे रणगाडे, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्रे अभियांत्रिकी उपकरणे त्याचप्रमाणे विविध लष्करी संग्रहालयाचे प्रदर्शन सुरू होईल. उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 4:30 वाजता होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाही यामध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, विशेष पथकांच्या कार्यवाही, आर्मी सिंफनी बॅंड, ड्रोन डिस्प्ले, फ्लायपास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजेपासुन हे प्रदर्शन सामान्य जनतेकरीता खुले राहणार आहे तरी या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन मेजर जनरल एस के विद्यार्थी यांनी केले आहे.