

वर्धा(Wardha )5 मे : जिल्ह्यात आंबा या पिकाची फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून उत्पादित आंब्याला बाजारपेठ, फळ पिकांचे निर्यातक्षम उत्पादन, विक्री व्यवस्थापन करणे व यामाध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देणे, याउद्देशाने 7 मे रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात आंबा पिकाचे क्षेत्र वाढविणे तसेच उत्पादित फळ पिकांचे निर्यातक्षम उत्पादन आणि योग्य विक्री व्यवस्थापन, जिल्ह्यातील जमीन आणि हवामान याबाबत कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ (आंबा फळपिक तज्ज्ञ) डॉ. भगवानराव कापसे, महा केसर आंबा बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब उगले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक दिवसीय आंबा महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.