म्हशीनं गिळलं मंगळसूत्र, शस्त्रक्रियेनंतरच मिळालं!

0

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सारसी गावात विचित्र प्रकार घडला. म्हशीनं एका महिलेचं मंगळसूत्र गिळलं. म्हशीला चारा टाकत असताना अचानक म्हशीनं सोन्याचं मंगळसूत्र तोंडात घेऊन गिळलं. सुमारे अडीच तोळ्याच्या व सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र म्हशीच्या पोटात गेल्याने कुटुंबाची तारांबळ उडाली होती. (Buffalo swallowed Mangalsutra)
संबंधित कुुटुंबाने नाईलाज होऊन यासंदर्भात पशुवैद्यक अधिकारी बाळासाहेब कौंदाने यांच्याशी संपर्क साधला. कौंदाने यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली की, सारसी गावात म्हशीने मंगळसूत्र खाल्ल्याचा फोन आल्यावर म्हैस दवाखान्यात आणण्यास सांगण्यात आलं. दवाखान्यात म्हशीची तपासणी करण्यात आल्यावर मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तिने मंगळसूत्र गिळले असल्याचे स्पष्ट झाले. ते काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर म्हशीच्या पोटातून मंगळसूत्र बाहेर काढण्यात आले.

यानंतर संबंधित कुटुंबाच्या जीवात जीव आला, असे कौंदाने यांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना चारा घालताना काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.