

Majhi Ladki Bahin Yojana :18 ऑगस्ट राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असून महिला-भगिनींसाठी यामुळे मोठी मदत होईल. यासोबतच महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्यात आले असून या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sports and Youth Welfare Minister Sanjay Bansode)यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये रक्कम गेल्या दोन-तीन दिवसांपासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही रक्कम जमा होईल, असे ना. बनसोडे म्हणाले. तसेच ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे. त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे, असे त्यांनी सांगितले. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)
समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून इयत्ता बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बनसोडे यांनी यावेळी केले.
प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी प्रास्तविकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती दिली. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार ९५ अर्ज पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष हृषीकेश कराड, प्रेरणा होनराव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना यावेळी बनसोडे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेसाठी महिलांच्या नाव नोंदणीत उकृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा सेविका यांचाही गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचा शुभेच्छा संदेश यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख यांनी सभागृहात वाचून दाखविला. या योजनेमुळे राज्यात आर्थिक सक्षमतेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्या स्वावलंबी होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. महाजन यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला. तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व बहिणीचे हार्दीक अभिनंदन केले.
महिलांनी क्रीडा मंत्री बनसोडे यांना राखी बांधून मानले शासनाचे आभार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याबद्दल लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात या महिलांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना राखी बांधून या योजनेबद्दल शासनाचे आभार मानले. आता आमची ओळख ‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण’ अशी झाली असून हे आमच्यासाठी सुखावह असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.