

दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणार स्पर्धा : ११६० खेळाडूंचा सहभाग
नागपूर, दि. ९ नोव्हेंबर २०२५ : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील ११६० खेळाडू आठ संघाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद अमरावती परिमंडलाकडे आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १२) सकाळी ९.१५ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग) व श्री. आदित्य जीवने (छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग), संचालक श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व नागपूर प्रादेशिक संचालक श्री. परेश भागवत, स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेते व उपविजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वसाधारण विजेत्या संघाला अजिंक्यपदाचा करंडक प्रदान करण्यात येईल. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. १५) दुपारी ५ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात होणार आहे.
या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री. अशोक साळुंके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव श्री. मधुसूदन मराठे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत.


















