महावितरणची नवी ऊर्जा: ‘ग्राहक देवो भव:’ साठी मनुष्यबळात क्रांती!

0
नागपूर दि. 28 ऑक्टोबर 2025:  महावितरणने नुकतीच लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर ‘ग्राहक देवो भव:’ या तत्त्वानुसार प्रत्येक वीज ग्राहकाला समर्पित, जलद आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठीच आहे, असे स्पष्ट मत महावितरणचे संचालक (संचलन तथा प्रकल्प) सचिन तालेवार यांनी व्यक्त केले.
सोमवारी (दि. 27) नागपूर येथील महावितरणच्या विद्युत भवन मुख्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. नागपूर परिमंडळात मागील दोन आठवड्यांपासून लागू असलेल्या या मनुष्यबळ पुनर्रचनेचा सखोल आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कामाचा ताण कमी, सेवेचा दर्जा वाढणार!
यावेळी तालेवार यांनी पुनर्रचनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले की, “यापूर्वी वीज अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा, वीजबिल वसुली अशा अनेक कामांचा मोठा ताण होता. नव्या पुनर्रचनेत कामाचा हा ताण कमी करून कर्मचाऱ्यांवर निवडक आणि केंद्रित स्वरूपाच्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि याचा थेट सकारात्मक परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या दर्जेदार सेवेवर होईल.”
ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करा: व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा
संचालक तालेवार यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना बदल मनापासून स्वीकारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ग्राहकांना महावितरणकडून उत्तम सेवेची खूप अपेक्षा आहे. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करा, तक्रारींचा निपटारा वेळेत करा आणि वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के गाठा.”
बदल अधिक ग्राहक-केंद्री करण्यासाठी सूचना द्या!
महावितरणने पुनर्रचनेचे प्रारूप लागू करताना ते अधिकाधिक प्रभावी कसे होईल यावर भर दिला आहे. तालेवार यांनी या बदलांच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या पारिस्थितिनुसार  दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यावेळी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला आवाहन केले की, “पुनर्रचना अधिकाधिक ग्राहक केंद्रित होण्यासाठी आपल्याला बदल आवश्यक वाटत असल्यास, त्याची निकड आणि कारण स्पष्ट करून तुमच्या सूचना जरूर द्या.”
या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, संजय वाकडे, मंगेश वैद्य आणि स्मीता पारखी यांचेसह नागपूर परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
रौशनी फाऊंडेशनतर्फ़े नेत्रदानाविषयी मार्गदर्शन
निवृत्त वीज कर्मचा-यांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्थापित रौशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैंन यांनी यावेळी मारणोपरांत नेत्रदानाचा उद्देश आणि कार्य याबाबत माहिती दिली. तसेच नेत्रदानाची आवश्यकता व महत्व सांगून मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. जास्तीतजास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करुन नेत्रहीन व्यक्तींचे जीवन सुकर करण्याचे आवाहन संचालक सचिन तालेवार यांनी यावेळी  केले.
 महावितरणमधील मनुष्यबळ पुनर्रचनेचा आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना संचालक सचिन तालेवार
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर