
गोंदिया (Gondia) :- महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील चार जागांचा फार्म्युला निश्चित झाला आहे. चारपैकी तीन जागा काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गेली आहे. गुरुवारी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यात तिरोडा मतदारसंघातून रविकांत बोपचे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांना उमेदवारी निश्चित झाली. याची अधिकृत घोषणा गुरुवारी झाली. तर आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील नावे उमेदवारांची नावे निश्चित झाली असली तरी त्यावर चर्चा करणे सध्या टाळले जात आहे. शुक्रवारी यादी जाहीर झाल्यावरच कळेल असे काँग्रेसचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते सांगत आहे. यादीत अपेक्षित नावे असणार की नवीन याला घेऊन सस्पेन्स कायम आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर आमगावमध्ये खासदार व आमदार यांच्यातील वादाचे पडसाद उमेदवारी यादीवर उमटण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यातच आता या दोन्ही मतदारसंघाचा काँग्रेसच्या पहिल्या यादीत समावेश नसल्याने इच्छुकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.













