मराठा आरक्षण महाविकास आघाडीनं घालवलं-फडणवीस

0

मुंबई MUMBAI : लाठीमाराचा कुठलाही आदेश मंत्रालयातून देण्यात आला नव्हता, असे स्पष्ट करताना तशा बातम्या पेरल्या जात असून मावळमध्ये झालेला गोळीबार हा त्या काळच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून झालेला का? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (DCM Devendra Fadnavis) यावेळी बोलताना फडणवीस यांनी लाठीमाराबद्दल क्षमायाचना देखील केली व दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले.

फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मराठा आरक्षण देण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने ते घालवले, असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे फडणवीस हे आरोप करताना त्यांच्या शेजारी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारीच बसलेले होते. फडणवीस यांनी सांगितले की, आपण 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा केला. हा कायदा देशात फक्त तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतच होता. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी याला स्थगिती दिली. त्यानंतरही उद्धव ठाकरे हे पुढचे एक वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्या काळात उद्धव ठाकरे यांनी वटहुकूम का काढला नाही? आम्ही दिलेलं आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारने घालवले. जे नेते मराठा समाजाचा पुळका आले असे दखवत आहेत त्यांनीच आरक्षण घालवले, असा स्पष्ट आरोपही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजेदेखील उपस्थित होते.