

बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा
नागपूर (Nagpur) : बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रास्ताविकेची विटंबना या दोन्ही घटनांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीने महायुती सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत तीव्र आंदोलन छेडले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर चढून या घटनांतील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधारी महायुती सरकारवर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा आरोप करत म्हटले की, “महायुतीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे राज्यात गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे जनतेचा विश्वास उडत चालला आहे.”
या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.