

मुंबई(Mumbai)13 जून:- नव्या विषयांवर आधारीत आशयघन चित्रपटांमुळे मराठी सिनेसृष्टी अवघ्या जगभरात ओळखली जाते. एक वेगळा विषय घेऊन मनोरंजनाने ठासून भरलेला ”हलगट” चित्रपटाचा पोस्टर दिनांक १२ जून २०२४ रोजी दणक्यात लाँच झाला आहे. पोस्टरमध्ये दिसणारं एक पात्र हातात सोन्याचे दागिने घेऊन कुत्सित स्मित देताना दिसत आहे. पात्राच्या डोळ्यांवर असणाऱ्या गॉगलमध्ये एका बाजूला एक पुरुष आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्री विशिष्ट गोष्टीला अनुसरून आशेने बघताना दिसत आहे. एकूणच पोस्टर सोनेरी रंगाने माखलेला दिसत असून एक गूढ आणि रहस्यमय गोष्टीकडे आकर्षित करत आहे.
कर्णन फिल्म्स निर्मित आणि आयमॅक्स टिव्ही डिजिटल प्रस्तुत (IMAX TV Digital Presents) हलगट चित्रपटाचे दिग्दर्शन करण सुमन अर्जुन या दिग्गज दिग्दर्शकाने केले आहे. बाबुराव केशव घोंगडे, अभिजीत सांघवी, जीवन माधव लहसे आणि करण सुमन अर्जुन हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश अवारी हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अभिजीत कुलकर्णी, छायाचित्रण अन्सार खान, संकलन संतोष घोठोस्कर, निर्मिती व्यवस्थापक विष्णू घोरपडे, संगीत निलेश पाटील, गीत पद्माकर मलकापुरे, पार्श्वसंगीत अजिंक्य जैन, पब्लिसिटी डिझाईन श्री. दत्तात्रय मुसळे, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा पूजा विश्वकर्मा, कला दिग्दर्शन जगदीश, पोस्ट प्रोडक्शन जयेश मलकापूरे अशा या टीमने चित्रपटाच्या सर्वांगीण बाजू भक्कमपणे पार पाडले आहे.
आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी आणि वावरणारे सामान्य पात्र जेव्हा मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसतात, तेव्हा त्यातली मनोरंजकता जाणून येते. अशाच सामान्य पात्रांची असामान्य गोष्ट ”हलगट” लवकरच प्रदर्शित होऊन रसिक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार यात शंका नाही.