वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार

0
वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Maharashtra will be number one for the next 50 years because of the port

पालघर:-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. वाढवण बंदर (Vadhavan Port)  प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या कंटेनर जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे देशासह राज्याला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होतं. मात्र, ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला आहे. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट इथे आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो आहोत. आता त्यापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होत आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

“पुढील २०० वर्ष हे बंदर राहील आणि नरेंद्र मोदी यांचे नावही राहील. भारताला पुढे नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लमेन्शन करून तयार केले आहे, असे वाढवण बंदर पाहून लोक म्हणतील. येत्या काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. येथील भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत, असे सांगत या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे आणि तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.