ऐन वेळी पावसाचा कहर

0

राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतक-यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या पावसाचा फटका बसला. त्यांच्या मुलाचे शुक्रवारी लग्न होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरात पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यात पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात शनिवारीही अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यामध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यातसुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.