

वायकर-कीर्तिकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा खुलासा
EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही
मुंबईतील शिवसेनेचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या आरोपावरून आता निवडणूक आयोगाने आज मोठा खुलासा केला आहे. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, असे स्पष्ट केले आहे.
वायकरंच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला.4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना ४१(अ) ची नोटीस बजावली आहे. त्यांना हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे समोर येईल. वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पाँईट, स्ट्राँग रुम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले आहे. त्याआधारे पोलीस पुढील तपास करणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
————-
ताईंना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला
पंकजा मुंडेंचाही अश्रुंचा बांध फुटला
पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्याही दोन घटना घडल्या आहेत. आता, दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच, त्यांनी मृताच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले. पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला, तर हे दृश्य बघून पंकजा मुंडेंचाही अश्रुंचा बांध फुटला.
—–
मोसमी पाऊस २० जुननंतर पूर्णपणे सक्रिय होणार
राज्यात पावसाचा जोर कमी
जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मोसमी पावसाने दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस मात्र विश्रांती घेतली. मात्र, येत्या २० जूननंतर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोसमी पाऊस वेळेआधीच राज्यात दाखल झाला. अंदमान-निकोबार नंतर केरळमध्ये तो दाखल झाला. तर त्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरात देखील वेळेआधीच मोसमी पावसाचे आगमन झाले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर येथेही मोसमी पाऊस दाखल झाला. मात्र, त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल रखडली. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
————–
राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी
प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर भाजपा आणि सहकारी पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील मस्क यांनी फक्त गाड्या बनविण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नयेत असे सुनावले आहे. तसेच ईव्हीएम हॅक होत नाही, या निवडणुकीनंतर सगळ्यांची तोंडे बंद झाल्याचे आपण पाहिले आहे असे सांगत राष्ट्रवादी राज्याच विधानसभेला २८८ जागा लढविण्याची तयारी करून बसली असल्याचे म्हटले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आम्ही आणि जुनी राष्ट्रवादी आणि आमचे सहकारी असे 57 आमदार आहेत.
—————–
ओबीसी उपोषणाचा चौथा दिवस
आंदोलकांची तब्बेत खालावली
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं यासाठी प्रा लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दोघांचीही तब्बेत खालावली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक असल्याचे मत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
—
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार!
व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची माहिती
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीची मासिक पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील बऱ्याच शाळा आता सुरू झालेल्या आहेत. तर काही भागात लवकरच सुरू होणार आहे.
———–
रेल्वे स्थानकात १०० रुपयांत मसाज
नागपूर, चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध
नागपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर २० जूनपासून मसाजची सुविधा वेटिंग हॉलमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मसाज चेअर’ बोलविण्यात आल्या आहेत. १० मिनिटांसाठी या स्वयंचलित मसाज चेअरवर सेवा घेण्यासाठी प्रवाशांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, चंद्रपूर रेल्वे स्थानक हे दक्षिणेतील आंध्र, तसेच तेलंगणा राज्यांच्या मार्गांना जोडणारे आहे. त्यामुळे विविध भागांतून येणारे प्रवासी या स्थानकावर उतरून दुसऱ्या ठिकाणच्या (कनेक्टिंग रेल्वे) गाडीची प्रतीक्षा करतात. त्यांच्यासाठी हि सुविधा करण्यात येत आहे.
—
महागाव तालुक्यात पुन्हा दरोडा
चक्क १६ क्विंटल मासोळीसह वाहनही पळवले
यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे एका शेतात सशस्त्र दरोडा टाकून एक कोटींच्या वर मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेतील आरोपींचा अद्यापही सुगावा लागला नसताना शुक्रवारी मध्यरात्री तालुक्यातील गुंज – खडका रस्त्यावर लुटारूंनी वाहन चालक, मदतनीसाला मारहाण करून चक्क १६ क्विंटल मासोळीसह चारचाकी वाहन लंपास केले. महागाव तालुक्यात घडत असलेल्या चोरी, दरोड्यांच्या या घटनांनी नागरिक दहशतीत आहे.