Maharashtra Rain News : सावधान! पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा

0

Maharashtra Rain News : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain News : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक- गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं पुढील 12 तासांत तिथेच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. पुढील 36 तासात उत्तरेकडे सरकत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी वर्तवली आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. सोबतच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मेघगर्जनांसह पावसासोबतच वाऱ्याचा वेग देखील 50 ते 60 किमी प्रति तास राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदूरबार, सांगली, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक आणि घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अहिल्यानगर, पुणे, बीड, कोल्हापूर आणि सातारा, संभाजीनगर, सोलापूर या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल होणार

दरम्यान, भारतीय हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात यंदा सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. केरळात मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.