
नागपूर (Nagpur) :- भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दीनानिमित्त सर्वत्र विविध सोहळे होत असताना, महामेट्रो नागपूर येथे देखील या संबंधाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मेट्रो भवन – या महा मेट्रो नागपूरच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात मेट्रोचे संचालक(वित्त) श्री हरेंद्र पांडे यांनी तिरंगा फडकावला आणि तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली.
या निमित्त उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना, श्री पांडे यांनी मेट्रोने अनेक कीर्तिमान स्थापित करत चांगले कार्य केले असून यापुढे देखील नागपूर मेट्रो फ़ेज – २ मध्ये आणखी चांगले कार्य करायचे आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची प्रवासी संख्या प्रतिदिवस १ लाख पर्यंत पोहोचली असून यापुढचे लक्ष्य हे २ लाख प्रतिदिवस प्रवासी संख्या असून यामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
नागपूर आणि पुणे येथे मेट्रो (Nagpur Metro) प्रकल्पाचे संचालन सुरु झाले असून पुढील काळात इतर विकसित शहरात देखील आपले प्रकल्प राहणार असल्याचे ते म्हणाले. महा मेट्रो एक प्रकल्प नाही तर हि एक संस्था असून या विकासाच्या कामात आपल्या सर्वांचा सहभाग राहणार असल्याचे ते म्हणाले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या करता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्मांना आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांना आपण वंदन करीत असल्याचे ते म्हणाले.
या आधी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मेट्रो भवन येथे तिरंगा फडकवत मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिरंगा झेंड्याला सलामी दिली.
















