

सायकल रॅलीच्या माध्यमाने दिला फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हीटी चा संदेश
नागपूर (Nagpur) ०६ जून:- महा मेट्रो आणि नागपूरचे सायकल मॅन डॉ अमित समर्थ यांच्या टायगर मॅन स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने मेट्रो आणि सायकल – या वाहतुकीच्या दोन महत्वाच्या साधनांचा वापर करत शहरात वावरणे किती सोपे होऊ शकते हे नागपूरकरांच्या मनावर बिंबवण्याकरता सायकल रॅलीचे आयोजन केले होते. विश्व सायकल दिवसाच्या निमित्तानेहे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत या दोन वाहनांचा मेळ घालत फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हीटी चे महत्व नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला.
या रॅलीमध्ये सुमारे ११०० नागपूरकरांनी भाग घेतला होता. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक श्री. प्रशांत जांभुळकर यांनी सदर रॅलीला झेंडा दाखवीत रवाना केले. १० किमी लांब या आयोजित सायकल रॅलीची सुरवात सेंट उर्सुला शाळा, सिव्हिल लाईन येथून सुरवात करण्यात आली. महा मेट्रो नागपूर सोबतच, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलीस विभाग, माइल्स एन मिलर्स, टायगर सिटी सायकलिंग क्लब आणि ऑरेंज सिटी रनर्स (Orange City Runners) या संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.
फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हीटी(First and last mile connectivity) ची आवश्यकता नागपूर सारख्या शहरात का आहे हे समजवण्यासोबतच, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती आणि पर्यावरणपूरक परिवहन सेवेचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनात करावा हे सांगण्याकरता या रॅलीचे आयॊजन करण्यात आले. नागरिकांनी याचा सुरक्षित साधन म्हणून वापर करावा, हे या माध्यमाने नागपूरकरांना सांगण्यात आले. उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रो मध्ये मेट्रो प्रवासा सोबतच आपली स्वतः ची सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी असून ज्याचा मोठ्या प्रमाणात नागरिक वापर करीत आहे ज्यामध्ये, शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
नागपूर हे मॉडेल सायकलिंग सिटी(Model Cycling City) होऊ शकते. नागपूर शहर हे सपाट असून शहरात सायकल चालविणे सोपे आहे. नागपूर शहरातील रस्त्यांची पायाभूत सुविधा अतिशय चांगली असून सकाळच्या वेळी वाहतूक देखील कमी असते. सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून अधिक लोकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहित करता येते. यामुळे दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्यास अधिक लोकांना प्रोत्साहन मिळेल. या सोबतच महा कार्ड ची माहिती देण्याकरता नागपूर मेट्रोचे कर्मचारी रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होते.