अनुकंपाधारकांच्या नोकरीचा प्रश्‍न लागणार मार्गी

0
oplus_2

आमदार सुधाकर अडबाले यांचा पुढाकार : बेमुदत उपोषण मागे

चंद्रपूर : महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांनी १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍त यांच्यासोबत १५ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता अनुकंपाधारकांची बैठक लावली. या बैठकीत झालेल्‍या चर्चेनुसार २०२३-२४ मध्ये पात्र अनुकंपाधारकांना ३० सप्‍टेंबर २०२४ पूर्वी त्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जातील, असे आयुक्‍तांनी मान्‍य केले. उर्वरित प्रतिक्षायादीतील अनुकंपाधारकांना कायमस्‍वरूपी नोकरी लागेपर्यंत मनपातील विविध विभागात कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती देण्यात यावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍तांना दिले. (Maharashtra Anukampa Bharti New GR 2024)

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंपाधारकांकडून अनुकंपा तत्‍वावर वर्ग क व ड च्या नोकरीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन मागणी होत असताना मनपाकडून दुर्लक्ष होत होते. त्‍यामुळे अनुकंपा कृती समितीच्या वतीने १४ ऑगस्‍टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. याची तात्‍काळ दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी सदर अनुकंपाधारकांसोबत बैठक घेण्याचे आयुक्‍तांना निर्देश दिले. यावर आयुक्‍तांनी १५ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता बैठकीचे पत्र दिल्‍यानंतर अनुकंपाधारकांनी बैठकीपर्यंत उपोषण स्‍थगित केले होते.

त्‍यानुसार आज स्‍वातंत्र्यदिनी मनपा आयुक्‍तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नियमानुसार अनुकंपाधारकांना नोकरी मिळाली पाहिजे, यावर चर्चा करण्यात आली. २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ मध्ये ज्‍या अनुकंपाधारकांना नोकऱ्या देण्यात आल्‍या, त्‍याचा आमदार अडबाले यांनी आढावा घेतला. २०२३-२४ मध्ये पात्र अनुकंपाधारकांना ३० सप्‍टेंबर २०२४ पूर्वी त्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जातील, असे आयुक्‍तांनी मान्‍य केले. ज्या अनुकंपाधारकांचे वय नियमानुसार बाद झालेले असेल, त्यांच्याबाबतीत उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवून वयाची अट शिथिल करण्याबाबत मनपाकडून प्रयत्‍न केले जावे. तसेच प्रतिक्षायादीतील उर्वरित अनुकंपाधारकांना कायमस्‍वरूपी नोकरी लागेपर्यंत मनपातील विविध विभागात कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती देण्यात यावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍तांना यावेळी दिले. आमदार अडबाले यांच्या पुढाकाराने झालेल्‍या चर्चेनंतर अनुकंपाधारकांचे समाधान झाल्‍याने कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

या सभेला महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, अति. आयुक्त चंदन पाटील, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, निमेश मानकर, प्रा. रवी झाडे, अनुकंपाधारक सुजय घडसे व इतर अनुकंपाधारक उपस्थित होते. आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत अनुकंपाधारकांनी त्‍यांचे आभार मानले.