

अमरावती (Amravti) 13 सप्टेंबर
महालक्ष्मी आणि गणेश उत्सवामुळे फुलांचे दर वधारले आहेत. एरवी ५० रुपये किलो असणारे फुल उत्सव काळात ३०० ते १००० रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत. याचा फायदा फूल उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र फुलांची लागवडच कमी असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ झाला आहे. हाच दर दिवाळी आणि दसरा उत्सवात राहिला तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात फुल शेतीचे प्रमाण नगण्य आहे. ओलिताची सुविधा असणारे शेतकरीच फुलाची लागवड करतात. याशिवाय ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे. यामुळे अनेक शेतकरी फुलाची लागवड करीत नाही. यातून फुल शेतीचे पाहिजे तसे क्षेत्र वाढले नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झेंडूसह इतर फुलांची पावसामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यातून जिल्ह्यातील फुलाचे उत्पादन घटले.
जिल्ह्यात झेंडूच्या फुलांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. गुलाब, शेवंती यासह विविध जातीच्या फुलाची लागवड केली तर त्याला ग्राहक मिळविण्यासाठी इतरत्र जावे लागते. ही ट्रान्सपोर्ट व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी अशा पध्दतीच्या फुलांची लागवड केलेली नाही.
वन टाईम हातात येणारे पीक म्हणून झेंडूकडे पाहिले जाते. एकाचवेळी झेंडू तोडला जातो. मात्र इतर फुलांना दररोज तोडावे लागते. यातून इतर फूल लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्केटिंगची व्यवस्था करून द्यावी.