

अमरावती:-शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. पोळ्याच्या तोंडावर दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. पावसामुळे शेतकरी जेरीस आले आहे. निंदण, फवारणीत हातचा पैसा निघून गेला आहे. त्यात महागाई वाढतीवर आहे. त्यामुळे पोळ्यावर महागाईचे सावट पसरले असून, हा सण कसा साजरा करावा, या चिंतेत जिल्ह्यातील बळीराजा सापडला आहे. सुरुवातीला पावसाने विलंब केला. त्यामुळे पेरणी रखडली होती. नंतर पावसाअभावी पेरणी उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती. आता अति पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडणे सुरू झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातुर दिसत आहे. पीक हातात येईपर्यंत आपल्याला उत्पन्न कमी होईल, या विचाराने ते बेजार बले आहे.जिल्ह्यात अति पावसामुळे ओल्या काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
बाजारात साहित्याचे दर वाढले आहेत. पोळ्यात बैलांना सजवून नेले जाते. मात्र, साज साहित्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे खरेदीकडे सध्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. पोळा हा बळीराजासाठी महत्त्वाचा सण असतो. लेकराप्रमाणे जपलेल्या बैलांना या दिवशी सजवून पोळ्यात नेले जाते.
त्यांची आदल्या दिवशी खांद शेकणी केली जाते
‘सर्जा-राजाची’ जोडी बळीराजाला धीर देते. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना आकार देते. त्यामुळे बळीराजही पोळ्याच्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करतो. त्यांनापुरणपोळीच नेवैद्य लावतो. त्यांना साजवितो. मात्र, यंदा बैलांना सजविण्यासाठी असलेल्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत, तरीही बैलाला सजविण्याचे साहित्य बळीराजाला विकत घ्यावेच लागणार आहे.
साजाचे भाव भिडले गगनाला
सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध साहित्य लागते. त्यात रंगीबेरंगी कासरे सव्वाशे रुपयांपर्यंत, तर बिकनी गाँडे ५० रुपये, बाशिंग जोडी ११० ते ५०० रुपये, वेसन ७५ ते ९० रुपये दराने विकली जात आहे. गोडे झुल्यासाठी १५० रुपये, तोडे व घुंगरे ५०० रुपये जोडी, मटाटी १०० ते १२५ रुपये जोडीवर पोहोचली आहे. सोबत पेपर, गेरू, ऑइल पेंट आदींचे दर वाढले आहे. भाव दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा पोळा महागाईच्या विळख्यात सापडला असल्याची भावना शेतकऱ्यांतूनव्यक्त होऊ लागली आहे.