नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटून त्यातील राख आणि चिखल अनेकांच्या शेतात पसरल्याने नुकसान झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खापरखेडा वीज केंद्रामधून निघणारी राख जवळच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात साठवली जाते. मात्र, हा राखेचा अवाढव्य बंधारा राखेने भरल्याने त्यातून आता राखमिश्रित चिखल बाहेर वहायला लागला आहे. यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी बंधार्याला गळती लागल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र, महानिर्मितीकडून दुरुस्तीचे काम वेळेत सुरु न झाल्याने बंधारा फुटून मोठ्या प्रमाणावर चिखलयुक्त राख बंधाऱ्याला लागून असलेल्या शेतांमध्ये पसरली.Khaparkheda Thermal Power Station
विशेष म्हणजे नागपुरात पावसाचे प्रमाण कमी असूनही ही परिस्थिती उद्भवली आहे. काल नागपुरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काठोकाठ भरलेला राखेचा बंधारा उन्हाळ्याच्या काळात मोकळीक असताना का रिकामा करण्यात आला नाही, असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.
दरम्यान, महानिर्मितीने बंधाराच्या फुटलेल्या भागात दुरुस्तीचे काम सुरु केले असून लवकरच बंधाऱ्यातून होणारी गळती थांबवली जाईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणाव राख बाहेर निघते. ही राख खसाळा-म्हसाळा परिसरातील तलावात साठवून ठेवली जाते. हाच बंधारा काल फुटला आणि त्यातून राखमिश्रीत पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. राखेचा थर साचल्याने अनेक वर्ष जमीन नापिक होते, त्यावर पिक घेता येत नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. राखेमुळे पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्याची समस्या देखील वारंवार निर्माण होत आहे.