महायुतीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का

0

अहमदनगर (Ahamadnagar)5 जून :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुरूवातीला एकतर्फी वाटत असलेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) व काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांनी अक्षरश: जिवाचे रान केल्याने अखेरच्या टप्प्यात जनमत निलेश लंके यांच्या बाजुने झुकले.त्यामुळे साधेसुधे असणारे निलेश लंके यांना मातब्बर असलेल्या डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर तब्बल 28 हजार 739 मतांची आघाडी घेऊन विजय संपादन करीत विखे यांच्या साम्राज्याला हादरा दिला.शिर्डी मध्ये ही महायुतकीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा दारूण पराभव झाला.नगर जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या लढतीमध्ये निलेश लंके हे खर्या अर्थाने जायंट किलर ठरले आहेत.

एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.सुरूवातीच्या 6 फेर्यांचे निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर झाले.मात्र त्यानंतर चे निकाल जाहीर करण्यास प्रचंड उशीर होत असल्याने विखे आणि लंके यांचे कार्यकर्ते नाराज झालेले दिसत होते.दरम्यान सुरूवातीले आघाडीवर असलेले सुजय विखे पाटील 8 व्या फेरीनंतर मात्र मागे पडले.निलंश लंके यांनी पारनेर,श्रीगोंदा व कर्जत जामखेड या तीन विधानसभा मतदार संघात मोठी आघाडी घेतले.भाजपा उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राहुरी,शेवगाव पाथर्डी व अहमदनगर शहर या तीन विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली.मात्र नगर शहरात देखील मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागांमध्ये लंके यांनाच आघाडी असल्याचे दिसून आले.कोविड च्या काळात भाळवणी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून सामान्यांकरिता केलेले काम,छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे आयोजन,शिव संवाद यात्रा व नागरिकांना देवदर्शन असे उपक्रम लंके यांना फेयदेशीर ठरले.तसेच लंके हे जुने शिवसैनिकच असल्याने शिवसेना उबाठा च्या सैनिकांनी त्यांना मनापासून साथ केली.राष्ट्रनवादीचे नेते शरद पवार यांनी स्वत:च लंके यांच्या प्रचारासाठी तालुक्यांमध्ये सभा घेतल्या.भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण,प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर,दबावाची राजनिती अशा अनेक मुद्यांना प्रभावीपणे जनते समोर मांडल्यानेच लंके यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला .निलेश लंके यांना एकूण 6 लाख 24 हजार 797 म्हणजे 47.14 टक्के व डॉ.सुजय विखे पाटील यांना 5 लाख 96 हजार58 म्हणजे 44.95 टक्के मते मिळाली आहेत.

2019 च्या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात एकूण 12 लाख 6 हजार 90 मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावला होता.2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळचे भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर दणदणीत विजय मिळविला होता.त्यावेळी डॉ.सुजय विखे यांना एकूण 7 लाख 4 हजार 660 तर जगताप यांना एकूण 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली होती.विखे यांनी जगताप यांचा एकूण 2 लाख 81 हजार 474 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळविला होता.विधानसभा मतदार संघ निहाय विखे व जगताप यांना पुढील प्रमाणे मते मिळाली होती.शेवगाव विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 29 हजार 968 तर जगताप यांना 69 हजार 270 मते मिळाली होती.राहुरी विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 26 हजार 713 तर जगताप यांना 54 हजार 910 मते मिळाली होती.पारनेर विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 17 हजार 81 तर जगताप यांना 80 हजार 372 मते मिळाली होती.अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 8 हजार 860 तर जगताप यांना 55 हजार 738 मते मिळाली होती.श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 9 हजार 103 तर जगताप यांना 78 हजार 511 मते मिळाली होती.कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात विखे यांना 1 लाख 5 हजार 236 तर जगताप यांना 80 हजार 563 मते मिळाली होती.पोस्टल मतदानामध्ये विखे यांना 7 हजार 699 तर जगताप यांना 3 हजार 822 मते मिळाली होती.