

दुसऱ्यांचे अश्रू दिसणे हेच सामाजिक कार्यासाठीचे ‘क्वालिफिकेशन’ – न्या. अनुजा प्रभुदेसाई
(Nagpur)नागपूर : दुसऱ्यांचे अश्रू दिसणे, इतरांसाठी तळमळ वाटणे ही सहिष्णुताच सामाजिक कार्यासाठी सर्वात मोठे ‘क्वालिफिकेशन’ असल्याचे प्रतिपादन न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी केले. लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘लोकमाता’ पुरस्कार वितरण सोहळा आज राम शेवाळकर सभागृह येथे आयोजिण्यात आला. त्यावेळी समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यंदाचा ‘लोकमाता’ पुरस्कार वृंदाबाई तळवी वैरागड यांना प्रदान करण्यात आला तर ‘लोकमाता सामाजिक संस्था’ पुरस्कार प्रमेष्ठी विशेष मतिमंद मुलांची शाळा, स्पंदन वेलफेअर मल्टीपर्पज इन्स्टीट्यूटला प्रदान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष अजय पाटील, देवेन दस्तुरे, संस्थेच्या अध्यक्ष कुंदा विजयकर, सचिव ज्योत्स्ना पंडित, डॉ. उदय बोधनकर यांची उपस्थिती होती.
न्या. अनुजा प्रभुदेसाई म्हणाल्या, सामाजिक सेवेचे संस्कार घरातून होतात. आपल्याला अधिक सामाजिक जन असलेले नागरिक तयार करायचे आहे. समाजात असलेल्या मतीमंद, अनाथ, दिव्यांग यांचे पालक व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी जमिनीबाबत एक प्रकरण सांगताना या संबंधित कायद्यांची माहिती करून देणे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळवून देणे हे देखील उत्तम समाज कार्य असल्याचे त्या म्हणाल्या. कायदे अंमलबजावणीसाठी सहिष्णुता आणि जागरूकता महत्वाची असल्याचे सांगत आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जाणे हीच समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
२५-३० गावात आपले कार्य असल्याचे सांगून तेंदू संकलन, शेती व्यवसाय, मत्स्य पालन, महिला शिक्षण- सबलीकरणासह अनेक क्षेत्रात आपण काम करत असल्याची माहिती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या वृंदा तळवी यांनी दिली. शिक्षण कमी असून सुद्धा आज अडीच ते तीन कोटींची उलाढाल त्या केवळ तेंदू संकलनातून करतात अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
स्पंदनचे (Pandurang Mahadev Sonawane) पांडुरंग महादेव सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले मतिमंद मुलांच्या संस्थांची परिस्थिती फारशी चांगली नाही. योग्य प्रकारे चालविल्या जात असलेल्या शाळांपैकी शासनाकडून स्पंदनचा गौरव करण्यात आला असून लोकसहभागातून शाळेने पायाभूत सुविधा निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली. हा पुरस्कार आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना समर्पित करत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव ज्योत्स्ना पंडित यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. वृषाली देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रामाणिक कार्याचा गौरव – अजय पाटील
आजच्या जगात जेव्हा पुरस्कार देखील कमर्शियल झाले आहेत, त्या काळात हा पुरस्कार म्हणजे प्रामाणिक कार्याचा गौरव असल्याचे अजय पाटील म्हणाले. अश्या प्रकारच्या कार्यक्रमांना सवलतीच्या दरात आपण राष्ट्रभाषा संकुलाचे सभागृह उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सामाजिक कार्याचा सन्मान करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.