स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका निभवावी

0
स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका निभवावी
Local self-government bodies should play an advisory role

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’ साजरा

नागपूर – लोकशाही यशस्वी होण्याची सुरवात ग्रामपंचायतीपासून होते. एकूणच आपल्या यंत्रणांची कामगिरी सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका योग्य निभवावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’, तसेच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, राजनगर येथे आयोजित करण्‍यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. रामदास आंबटकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.  सांडपाणी, घनकचरा, पिण्याचे पाणी, रस्ते, पुराच्या पाण्याचा निचरा, नाले सफाई या बद्दल लोकांना अनेक समस्या येतात. त्यासाठी त्यांना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकेचे खेटे घालावे लागतात. अश्या परिस्थितीत जर स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागतिक दर्जाची तज्ञ मंडळी, नवनवीन तंत्रज्ञान, यांचा योग्य उपयोग करून शाश्वत, परवडणारे, सोपे मॉडेल सार्वजनिक-खाजगी भागीदारी आधारावर तयार केले, त्या बद्दल योग्य सल्लागारची भूमिका बजावली तर लोकांचा त्रास कमी होईल अश्या  सूचना त्यांनी केल्या. याशिवाय नागपूर केंद्राच्या  रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

भविष्य हे एलएनजी, सीएनजी  आणि बायोइंधनाचे असल्याचे सांगून , ‘वेल्थ  फ्रॉम वेस्ट’ कसे करता येईल यावर त्यांनी भर दिला, तसेच आपण कायम चांगल्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन देखील दिले. सुरवातीला ना. श्री. गडकरी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ‘वे टु गुड गवरनन्स’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले.