
चंद्रपूर – सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत आणि मानवतेचा उच्च आदर्श प्रस्थापित करत चंद्रपूर येथील समाजसेवक जितेंद्र मशारकर यांनी आपल्या वाढदिवशी थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णाला जीवनदान दिले.
कु. सुदिक्षा मनोहर गंपलवार (रा. चांदली बूज, ता. सावली) ही थॅलेसिमिया रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचाराधीन आहे. तिला O+ रक्ताची तातडीची आवश्यकता असल्याचे समजताच छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि शंखनाद न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले.विशेष म्हणजे, या वाढदिवशी त्यांनी आपले ७५ वे रक्तदान पूर्ण केले असून समाजसेवेची एक अनोखी भेट दिली. त्यांच्या या मानवतावादी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. स्वाती देरकर, डॉ. मिलिंद झाडे, राकेश शेंडे, जयसिंग डोंगरे, महेश काहीलकर, डॉ. गुनिका पोटदुखे, राम सोनकर आणि धनंजय साखरकर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी जितेंद्र मशारकर यांच्या सामाजिक कार्याचे आणि संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले.
रक्तदान हे केवळ मानवी जीवन वाचविण्याचे साधन नसून समाजातील ऐक्य आणि सहभावनेचे प्रतीक आहे. जितेंद्र मशारकर यांनी आपल्या ७५ व्या रक्तदानाच्या माध्यमातून ‘रक्तदान हेच महादान’ या संदेशाला अर्थपूर्ण रूप दिले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



















