


दाभोलकर हत्या प्रकरण
पुणे(Pune), १० मे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर(Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
डॉ. दाभोलकर यांची हत्येनंतर तब्बल साडे दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी आज, शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले की, डॉ. तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकारी पक्ष अपयशी ठरले. तर भावे आणि पुनाळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
दरम्यान सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे.
खटल्याची सुनावणी सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद केला. त्यातील एका युक्तीवादात बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन केले होते. ही बाब अत्यंत गंभीर असून अशाप्रकारे गुन्ह्याचे समर्थन करणे योग्य नाही. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.
आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास न केल्यामुळे तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपीची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच युएपीएचे कलम सिद्ध होऊ शकले नाही, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या घटनाक्रम
२० ऑगस्ट २०१३ – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या
३० ऑगस्ट २०१३ – सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व ई मेल्सची तपासणी
२ सप्टेंबर २०१३ – रेखाचित्र तयार व १७ संशयित ताब्यात
१९ डिसेंबर २०१३ – गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक
१३ मार्च २०१३ – नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड
९ मे २०१४ – केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) तपास वर्ग
३१ डिसेंबर २०१६ – सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडे व पुण्याच्या सारंग अकोलकर यांच्या घरावर छापे
११ जून २०१६ – डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक
१४ जून २०१६ – या गुन्ह्याचे सूत्रधार तावडे असल्याचे ‘सीबीआय’चा न्यायालयात दावा
३० नोव्हेंबर २०१६ – वीरेंद्र तावडेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
२१ मे २०१८ – पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अमोल काळेला अटक
६ जुलै २०१८- न्यायालयाने तावडेचा जमीन फेटाळला
१० ऑगस्ट २०१८ – दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून (एटीएस) मुंबईतून सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, शरद काळे यांना अटक
१८ ऑगस्ट २०१८ – ‘एटीएस’ने सोडून दिलेल्या सचिन अंदुरेला सीबीआयकडून अटक
३१ ऑगस्ट २०१८ – अमित दिगवेकर व राजेश बंगेरा यांना सीबीआयकसून अटक
४ ऑक्टोबर २०१८ – डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा सीबीआयचा दावा
१५ सप्टेंबर २०१८ – डॉ. तावडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित