

सोलापूर (Solapur)8 जून पती श्रीकांत यलगोंडे याच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर, फॅनचा गट्टू, कंबरेचा पट्टा व दगडाने मारून त्याचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी श्रीकांत यलगोंडे (वय २७) व तिचा भाऊ विजयकुमार राजेंद्र पाटील (वय २२) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आय. एम. शेख नाझीर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
जुळे सोलापुरातील रोहिणी नगरात शिक्षक सोसायटीत श्रीकांत व अश्विनी भाड्याने राहायला होते. श्रीकांतला दारूचे व्यसन होते. श्रीकांत हा पत्नी अश्विनीवर संशय घेत होता. त्यावरून तो अश्विनीला मारहाण, शिवीगाळ करायचा. त्यामुळे अश्विनीने २९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात भाऊ विजयकुमार पाटील याच्या मदतीने श्रीकांतला जबर मारहाण केली. विजयकुमारने कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. जखमी श्रीकांत उठून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अश्विनी व विजयकुमार या दोघांनी त्याला नादुरुस्त प्लेटने व दगडाने डोक्यात मारहाण केली. श्रीकांतच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतर आरोपींनी त्याला ओढून बाथरूममध्ये टाकले. तो ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात ओढणी कोंबली होती. अश्विनीने श्रीकांतच्या अंगावर पाणी ओतून सगळे रक्त धुऊन काढले. त्याच्या अंगावरील कपडे देखील धुऊन काढून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.