विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये

0

 

-उदय सामंत (Uday Samantha)

नागपूर (Nagpur) -माजी मंत्री आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray)यांच्या गद्दारीच्या आरोपासंदर्भात बोलताना, भाजपबरोबर जायचे हे आधीच स्पष्ट झालेले असताना काँग्रेस सोबत निवडणुकीनंतर जायचे ही विचारांची गद्दारी करणाऱ्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रपरिषदेत आज लगावला. ठाकरे गटाचे आठ आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला.

रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेचीच आहे हे ठासून सांगताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच लढेल आणि तो उद्या नामांकन दाखल करेल. अर्थात कुणाला उमेदवारी द्यायची हा मुख्यमंत्री निर्णय घेतील. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार व आढावा बैठकीच्या निमित्ताने आले असता ते पत्र परिषदेत बोलत होते. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर पक्षासाठी जो त्याग केला, त्यांना योग्य वेळी योग्य ती जबाबदारी दिली जाईल पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही असेही सामंत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पाच तसेच दुसऱ्या टप्प्यातील पाच अशा सर्व दहाही जागा महायुती जिंकेल. आमच्यासमोर उभे असलेले उमेदवार निष्प्रभ असल्याचा दावा केला.

10 एप्रिल रोजी कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार असे माहीत असताना त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.पर्यायी एबी फॉर्म देखील तयार ठेवण्यात आला. हा एका महिलेचा अपमान असून काँग्रेसचा कुटील डाव या निमित्ताने स्पष्ट झाला. उमेदवारी अर्ज रद्द झाल्याचे खापर विरोधकांवर फोडण्यात अर्थ नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले . यावेळी माजी मंत्री डॉ दीपक सावंत, खासदार कृपाल तुमाने, किरण पांडव, जयदीप कवाडे,बाबा गुजर आदी उपस्थित होते.