कडक उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी सुमारे ३० टक्के वाढली

0

पुणे 19 मे  : यंदा कडक उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी सुमारे ३० टक्के वाढली नाहे. त्यात पालिकेकडून कमी पाणीपुरवठा कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून पाणी टॅंकर्सची मागणी एप्रिलमध्ये विक्रमी वाढली आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडूनच आकडेवारी जाहीर करण्यात आली. एप्रिल २०२४ मध्ये शहरात टॅंकरच्या तब्बल ४१ हजार ६०३ फेऱ्या झाल्या. यात सर्वाधिक मागणी समाविष्ट ३४ गावांमध्ये आहे. तर, एप्रिल २०२३ मध्ये हा आकडा ३३ हजार ६४३ होता.

दरम्यान, यंदाच्या मेमध्ये पहिल्या दहा दिवसांतच टॅंकरचा आकडा १५ हजार फेऱ्यांवर गेला आहे. एप्रिलमध्ये शहरातील तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांवर राहिला. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली. पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने मोठया सोसायटीज्, उपनगरे आणि समाविष्ट गावांमध्ये पाण्याची मागणी लक्षणीय वाढली.जेथे पाणीपुरवठा होत नाही किंवा जेथे काही कारणाने पाणी पोहोचू शकलेले नाही, अशा ठिकाणी महापालिकेतर्फे मोफत टँकर दिले जातात.

महापालिकेकडे टँकरची संख्या कमी असल्याने ठेकेदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. किमान आठ टँकर असलेल्या ठेकेदारांमार्फत अन्य ठिकाणी पाणी पोहोचवले जाते. यासाठी ठेकेदारांना शुल्क देते. तर ज्या सोसायट्यांना पाणी कमी पडते किंवा त्यांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे त्यांना खासगी ठेकेदार पाणी पुरवत आहेत.