कालिदास हा जागतिक पटलावरचा कवी – डॉ. पंकज चांदे

0

भाऊजी दप्तरी यांच्या जयंतीनिमित्त व्‍याख्‍यान

नागपूर, 24 डिसेंबर: कालिदास हा विषय म्‍हणजे ज्ञानाचा समुद्र आहे. ज्ञान, कला, साहित्य या सगळ्यात ज्‍याचा उल्‍लेख आढळतो असा तो जागतिक पटलावरचा कवी आहे. त्‍याने आपल्या जागतिक स्तरावरील साहित्यात वैदर्भी रीती वापरल्‍यामुळे ते साहित्य सर्वसामान्यांना पटकन समजते, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.

विदर्भ साहित्य संघ-ग्रंथसहवासतर्फे कै. के. ल. उपाख्य भाऊजी दप्तरी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ‘कवी कालिदासाचे श्रेष्ठत्व’ या विषयावर ते बोलत होते. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या ग्रंथसहवासमध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ लेखक, संशोधक आणि विचारवंत डॉ. राजेंद्र डोळके होते.
रघुवंश, शाकुंतल, ऋतू संहार, मेघदूत अशा कालिदास यांच्‍या विविध साहित्‍यकृतींचा उल्‍लेख करताना डॉ. चांदे म्हणाले, शेक्सपिअरपेक्षा कालिदास सरस होता. त्‍याच्या रचना उपमांकरिता प्रसिद्ध आहेत. कालिदासाने मेघदूत या खंड काव्यात मेघाला दूत केले आहे. अशी उपमा कोणत्याही काव्यात आढळत नाही. त्याच्या काव्यात उपमा आणि अर्थांतरन्यास यांचा सुंदर संगम आढळतो, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. राजेंद्र डोळके यांनी कालिदासाच्या साहित्याचा संशोधनात्मक विचार करायला हवा, असे विचार मांडले. भाऊजी दप्तरी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, विद्वतरत्न ही पदवी भाऊजी दप्तरी यांना लोकमान्य टिळक यांनी दिली. भाऊजी हे बुद्धिवादी होते. कालिदासांबद्दलही भाऊजींनी लिखाण केले आहे. भाऊजींनी उपनिषदांवर चार ग्रंथ लिहिले असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले. विद्वतरत्न डॉ. के. ल. दप्तरी स्मृती संदर्भ ग्रंथालय, महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी स्मृती ग्रंथालय या नावानेही हे ग्रंथालय ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, माधुरी वाडीभस्मे, डॉ. मोनाली पोफरे, तसेच दप्तरी कुटुंबिय उपस्थित होते.