बाल अनुकूल पोलिसिंग शिकावी नागपूरच्या या चार पोलिसांकडून

0

 

बाल अनुकूल पोलिसिंग शिकावी नागपूरच्या या चार पोलिसांकडून

बाल अनुकूल पोलिसिंग म्हणजे काय ? नागपूर शहर पोलिसांच्या या चार कर्मचाऱ्यांना बघा म्हणजे कळेल

गुन्हे दररोज घडतात, गुन्ह्यांच्या ढीगभर बातम्या आपण दररोज वाचतो – बघतो.या बातम्या असोत किंवा पोलीस ठाण्यांत धूळ खात असलेल्या असंख्य फाइल्स असोत, त्या मुळात लोकांच्या शोकांतिका आहेत. गुन्ह्यांच्या अनेक घटनांमध्ये मुलं, कायद्याच्या भाषेत अल्पवयीन असतात, निरनिराळ्या भूमिकांमध्ये ; आणि असतात पोलीस. मुलं आली तिथे कारुण्याची किनार आली. किंबहुना यावीच. कधी कर्तव्यभावनेपोटी , कधी कारुण्यापोटी तर कधी समोरच्या निरागस बालकाची कीव म्हणून, पोलीस कायद्याच्या कागदी तरतुदींच्या फार पुढे जाऊन काम करतात.

नागपूरच्या चार पोलिसांनी त्यांच्या आयुष्यातील असेच अनुभव सांगितले आहेत. भारतीय कायद्यातील ‘बाल न्याय प्रणाली’  या विषयावर गेल्या आठवड्यात नागपूर शहर पोलीस व प्रकृती ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत या चौघांनी सांगितलेली ही संस्मरणे . . .

हातभट्टी ते आयटी कंपनी, प्रवास त्या गरीब पोराचा

  • मेघा गोखरे,  पो नि, यशोधरा नगर ठाणे

मेघा गोखरे या सध्या यशोधरा नगर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपूर्वी, अवैध दारू विक्री विरुद्ध कार्यवाही करताना एक गरीब मुलगा दारू विकताना गोखरेंना आढळला. घरात अठराविश्वे दारिद्रय, अज्ञानी पालक आणि उदासीन नातेवाईक अशी या मुलाची एकूण परिस्थिती होती.या मुलापुढे नियतीने मांडून ठेवलेल्या अंधकारमय आयुष्याचा अंदाज मेघा गोखरे यांना आला होता आणि म्हणून त्यांनी कायद्याच्या चौकटीपलीकडे जाण्याच्या निश्चय केला. मुलाच्या वडिलांना समजावून गोखरे यांनी त्या मुलाला व त्याच्या वडिलांना अवैध दारूविक्री बंद करून मासोळीचा व्यवसाय सुरु करायला लावला आणि त्यासाठी पदरमोड करून भांडवलही उभारून दिले. गोखरे यांनी मुलाचे शालेय शिक्षण परत सुरु करविले, त्यासाठीही आर्थिक मदत केली.

हा मुलगा अभ्यासात हुशार निघाला. त्याला इंजिनीरिंग ला प्रवेश मिळाला. त्याची इंजिनीरिंग ची संपूर्ण फी गोखरे यांनी भरली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तो मुलगा आता एका नामांकित आयटी कंपनीत चांगल्या पॅकेज वर नोकरी करतो आहे. मुलाच्या वडिलांचा मासोळीचा व्यवसाय सुद्धा यशस्वी झाला आहे आणि त्यांनी या व्यवसायातून येणाऱ्या मिळकतीवर स्वतःच घर बांधलं आहे. इंग्रजीत म्हण आहे कि एक मूल वाढवायला अख्ख गाव लागतं ! गोखरेंची हकीकत एकूण वाटतं जे गावाला जमलं नाही ते एका पोलिसबाईंनी करून दाखवलं.

वस्तीची दिशाहीन मुलं आता आयुष्याचा विचार करू लागलीत

  • मोसमी कटरे, पीएसआय, सीताबर्डी

मोसमी कटरे या सध्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना शहराच्या एका झोपडपट्टीच्या मुलामुलींची ‘पोलीस दीदी’ होण्याची संधी मिळाली.अल्पवयीन मुलामुलींचे प्रेमसंबंध, अल्पवयीन प्रेमी जोडप्यांचे पळून जाणे, किशोर गर्भधारणा इत्यादी सामाजिक समस्या या वस्तीत रोजच्या गोष्टी होत्या. अहो आश्चर्यम ! आज या वस्तीत अल्पवयीन प्रेमी जोडप्यांचे पळून जाणे, पोलिसांच्या भाषेत म्हणायचे तर कलम ३६३ ची प्रकरणे जवळपास नाहीत.

ही कमाल कशी झाली ? कटरेंनी असं काय केलं ? त्यांची काम करण्याची पद्धत मोसमी कटरे एका उदाहरणाद्वारे सांगतात. वस्तीची एक अल्पवयीन मुलगी वस्तीच्याच एका मुलाबरोबर पळून जात आहे असं कटरे यांना कळतं. हे नेहमीचंच. मुलगी काही क्षणांनंतर घरातून निघून जाणार तोच कटरे तिला गाठतात. मुलीने बॅग भरलेली.एक मैत्रीण होऊन कटरे तिच्याशी बोलतात आणि बोलताना तो प्रश्न विचारतात ज्या प्रश्नाने त्या मुलीच्या आयुष्याची दिशा बदलते. “या वस्तीतल्या असंख्य मुलींप्रमाणे तुला तुझ्या आयुष्याची राखरांगोळी करून घ्यायची आहे कि माझ्या सारखं आयुष्य जगायला आवडेल ?”. मुलीने त्या दिवशी मोसमी दीदी सारखं होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी या मुलीने पॅरामेडिकल सायन्स मध्ये पदवी पूर्ण केली आहे आणि आता नोकरीला सुरुवात करणार आहे.

अश्या असंख्य मुली, आणि मुलांना सुद्धा, मोसमी दीदी ने चुकीच्या मार्गापासून परावृत्त केले. अभ्यास, खेळ, कौशल्य शिक्षण आणि स्वयंरोजगार अश्या विविध क्षेत्रांत आता वस्तीचा किशोरवर्ग प्रगती करतो आहे. २३ मुलांनी खेळांमध्ये राज्यस्तरीय पदके जिंकली आहेत, कटरे सांगतात. वेळ द्यावा लागला, मेहनत करावी लागली, पण त्याचे चीज झाले ; हे समाधान कटरेंना आहे.अडनिड्या वयाच्या मुलामुलींच्या आयुष्याची दिशा मोसमी कटरे यांच्यासारख्या पोलीस दीदी बदलू शकतात हे येथे विशेष उल्लेखनीय.

जेंव्हा १३ वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिला

  • मीनाक्षी काटोले, पीएसआय, बजाज नगर

काही घटना पोलिसांच्याही अंगावर काटा आणतात ! अशीच एक घटना कोरोना काळात शहरात घडली. एक १३ वर्षाची मुलगी आणि तिचा १५ वर्षाचा भाऊ. आईवडील कामाला जायचे आणि हे दोघे घरीच असायचे. स्मार्टफोन वर पॉर्न बघून या दोघांनी संभोग केला आणि ही चिमुकली गर्भार झाली.ती साढे आठ महिन्यांची गर्भवती असताना प्रकरण उघाडकीस आलं.

मीनाक्षी काटोले या बजाज नगर ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत.सदरहु प्रकरणात मेडिकल लीगल केस दाखल झाली आणि काटोले तपासासाठी दवाखान्यात पोचल्या. मुलगी दाखल असलेल्या वार्डाबाहेर मुलीची आई ब्लेड घेऊन उभी. पोलीस मुलीशी बोलायला गेले किंवा गुन्हा दाखल केला तर मी नस कापून इथेच जीव देणार या तयारीने. मोठ्या शिताफीने पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. पोलिसांच्या एका चमूने आईला सांभाळले व काटोले मुलीशी बोलायला गेल्या. प्रचंड घाबरलेली ती निरागस मुलगी काहीच बोलायला तयार नव्हती.

तिच्याशी बोलून माहिती काढणे, तिच्या सुरक्षित प्रसूतीचा बंदोबस्त करणे, आणि पुढचा तपास ;हे अख्ख प्रकरण पोलिसांच्या कौशल्याची कसोटी लावणारं होतं. काटोले आणि त्यांचे सहकारी महानगरपालिकेचे कर्मचारी बनून, वेषांतर करून तपासासाठी मुलीच्या घरी गेले, त्या वसाहतीतही फिरले, बेमालूमपणे तिच्या शेजाऱ्यांशी, आजीशी आणि इतकंच काय तिच्या भावाशीही बोलले. सरतेशेवटी मुलीला जबाब नोंदवायला तयार करणे हे महाकठीण काम होतं . आपलं सर्व कौशल्य पणाला लावून काटोले यांनी ते केलं. त्या मुलीने आता परत शालेय शिक्षणाला सुरुवात केली आहे, बाळाची कायदेशीर दत्तकप्रक्रिया झालेली आहे आणि मुलीचा भाऊ किशोर न्यायिक प्रक्रियेला समोर जातो आहे.  एकूण हे प्रकरण अंगावर काटा आणणारं आणि त्याचा तपास दोरीवर चालण्यासारखा, अश्या शब्दांत मीनाक्षी काटोले या प्रकरणाचं वर्णन करतात.

१२ महिन्यांत ९२ लोकांना शोधून काढणारा नागपूर पोलिसांचासर्च चॅम्पियन

  • सुधीर खुबाडकर, हवालदार, शांती नगर

नागपूर शहर पोलिसांकडे एक असा ‘सर्च चॅम्पियन’ आहे ज्याने १२ महिन्यांत ९२ हरवलेल्या लोकांना शोधून काढलंय. सुधीर खुबाडकर हे सध्या शांती नगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. खुबाडकर यांनी जी कामगिरी करून दाखविली आहे त्यामागे त्यांची प्रचंड चिकाटी आहे. लोकांना शोधण्यासाठी खुबाडकर यांनी अख्खा देश पालथा घातला आणि कसा, तर रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास करून, खाली झोपून. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी माणसं हुडकून काढली आणि नागपुरात परत आणली. हा अवलिया माणूस नेहमी प्रवासाची बॅग भरून तयार ठेवतो आणि हरवलेल्या लोकांचे फोटो स्वतःच्या पाकिटात बाळगतो !

सुधीर खुबाडकर यांचं काम बघून पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनीही कौतुकाची थाप दिली.पंधरा हजाराच्या रोख बक्षिसासह अलीकडेच आयुक्तांच्या हस्ते खुबाडकर यांचा सत्कार झाला. खुबाडकर बातम्यांमध्येही चमकले. परंतु, हे झाले यशानंतरचे कौतुक. यशामागे जे काम आहे ते आले चिकाटीतून आणि ही चिकाटी, ही जिद्द कुठून आली ?

“हे जे लोकं हरवतात, निघून जातात, हे कोण आहेत. यात जीव नकोसा झालेली नवविवाहिता आहे, घरच्यांशी भांडून निघालेली पोरसवदा मुलगी पण आहे, म्हातारे आहेत, मनोरोगी आहेत, लहान मुलं पण असतात. ही माणसे, मुलं जर सापडली नाहीत किंवा चुकीच्या लोकांच्या हाती पडली तर त्यांचे काय हाल होतील,त्यांच्या घरच्या लोकांचा किती मनस्ताप होईल हा विचार माझ्या मनात असतो. हरवलेली, पारखी झालेली घरची माणसं, मुलं जेंव्हा परत भेटतात, त्या क्षणाला लोकांच्या डोळ्यात जे अश्रू येतात ना ते बघून माझा सगळा थकवा, प्रवासाची सगळी मरगळ निघून जाते हो !”, खुबाडकर म्हणाले.

या सगळ्या हकीकती सांगण्यासारख्या का आहेत ?

या फक्त पोलिसातल्या काही चांगल्या लोकांच्या आणि त्यांच्या कौतुकाच्या कथा नाहीत. या सगळ्या हकीकतींमध्ये एक समान धागा आहे, बाल अनुकूल आणि परिणामकारक पोलिसिंगचा. प्रत्येकच प्रकरणात पोलिसांना इतका आटापिटा करावा लागेल असं नाहीये. पण येत्या काळात, विशेषतः अल्पवयीनांच्या बाबतीत रचनात्मक पोलिसिंगनेच दीर्घकालीन फायदा दिसेल,असा गमक या हकीकतींमध्ये सापडतो.