

नागपूर (Nagpur) : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) च्या परिधीय केंद्रांपैकी एक असलेल्या क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, नंदनवन, नागपूरचे सहाय्यक संचालक डॉ. मिलिंद सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत आयुष मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कामगिरीची माहिती आज पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
डॉ. मिलिंद सूर्यवंशी म्हणाले की, अलीकडेच आयुष मंत्रालयाने ‘मिशन उत्कर्ष प्रकल्प’ आणि ‘प्रोजेक्ट EMRS’ हे दोन महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले आहेत. मिशन उत्कर्ष प्रकल्प हा 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाची लक्षणे/ स्थिती सुधारण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या चौकटीत राहून सुरू करण्यात आला आहे.
मिशन उत्कर्ष प्रकल्प या योजनेचे उद्दिष्ट भारतातील धुबरी, पश्चिम सिंगभूम, बस्तर, गडचिरोली, धौलपूर या पाच जिल्ह्यांतील अंगणवाडी केंद्रांमध्ये नोंदणीकृत किशोरवयीन मुलींना परिणामकारक आणि सुरक्षित आयुर्वेदिक औषधे प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत, 14 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 25600 नोंदणीकृत लाभार्थ्यांना या प्रभावी आणि सुरक्षित आयुर्वेदिक औषधांचा लाभ मिळणार आहे. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (CCRAS), ऑल इंडिया आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूर आणि IIPH-DIL या संस्था या कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहेत.
याव्यतिरिक्त, एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) हा प्रकल्प विद्यार्थ्यांमधील निवडक रोगांवर (जसे क्षयरोग, अशक्तपणा, सिकलसेल आणि कुपोषण) विशेष लक्ष केंद्रित करून सामान्य आरोग्य तपासणी आणि अशक्तपणा आणि कुपोषणाचे आयुर्वेदिक व्यवस्थापन यावर भर देण्यात आला आहे.
आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांच्यातील सहयोगी प्रकल्पाअंतर्गत आरोग्य विषयक अभ्यासाचा एक भाग म्हणून, EMRS या प्रकल्पाद्वारे देवरा, बोरगाव, अहेरी, खैरी परसोडा आणि चिखलदरा येथे इयत्ता 6-12 च्या विद्यार्थ्याचे स्क्रीनिंग आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 2200 विद्यार्थ्यांची चाचणी करून त्यांना आयुर्वेदिक औषधाचा लाभ दिला जाणार आहे.