
नागपूर -विदर्भातील शेतकऱ्यांना कमी खर्चात कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी, शेतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे आज शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. २७ नोव्हेंबरपर्यंत मान्यवरांच्या विविध विषयांवर 31 कार्यशाळा होणार आहेत. विदर्भासोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगडमधूनही शेतकरी मोठ्या संख्येने या प्रदर्शनात आले आहेत. अमरावती मार्गावरील दाभास्थित पीडीकेव्ही, दाभा मैदानावर होत असलेल्या या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महसुल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा कृपाल तुमाने, दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मीनेश शहा, डॉ सी.डी. मायी, रवी बोरटकर, रमेश मानकर, सुधीर दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध नामांकित ४५० कंपन्यांचे स्टॉल असून यंदा मदर डेअरी, उस, बांबू, संत्रा अशा विविध महत्त्वपूर्ण विषयावर लहान-मोठ्या ३१ कार्यशाळा आयोजित आहेत. विशेष म्हणजे, यंदा महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचेही जवळपास ६० स्टॉल्स या प्रदर्शनीत आहेत.