दिव्‍यांग खेळाडू प्रतिमा बोंडे यांना स्‍व. उषा संत पुरस्‍कार प्रदान

0

आशादीप’ संस्थेचा 32 वा वर्धापनदिन सोहळा उत्‍साहात संपन्‍न

नागपूर (Nagpur):- ‘आशादीप’ अपंग महिला – बाल विकास संस्थेचा 32 वा वर्धापनदिन सोहळा शनिवारी रंजन सभागृह, मातृसेवासंघ येथे उत्‍साहात पार पडला. यात पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांना स्व. उषा संत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी एचडीएफसी बँकेचे डेप्‍युटी व्‍हाईस प्रेसिडेंट अच्युत तिजारे, मातृसेवा संघाच्‍या वैद्यकीय चिकित्सक डॅा. पुष्पा भावे यांची उपस्‍थ‍िती होती.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी लालासाहेब पाटील होते. आशादीपच्या जानेवारी ते जून 2025 या अर्धवार्षिक ई-नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, 2024-25 या सत्रातील दिव्यांग व विकलांग गटांमधील शालांत माध्यमिक, उच्च माध्यमिक , पदवी व पदव्युत्तर परिक्षांमधून उत्तीर्ण झालेल्‍या 14 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्‍यात आला.

अच्युत तिजारे यांनी आशादीपच्‍या कार्याचे तसेच गुणवंतांचे अभिनंदन केले तर डॅा. पुष्पा भावे यांनी कमलाताई होस्पेट व उषाताई संत यांच्‍या मातृसेवा संघ व आशादीप या संस्‍था एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्‍याचे सांगितले. लालासाहेब पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात स्वर्गीय उषाताई संत यांनी 1993 साली आशादीप संस्थेची स्थापना केल्यापासूनच्या काळातल्या कार्याच्या काही आठवणी सांगितल्या.

प्रास्ताविकातून आशादीप संस्थेच्या अध्यक्षा डॅा. प्रतिमा शास्त्री यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आशादीपच्या पुढील वर्षाच्या नव्या योजना जाहीर केल्या. तर संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी सत्र 2023-24 मधील आशादीपच्या कार्याचे अहवाल वाचन केले. गीता तारे व वीणा मोहाडीकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला तर डॅा. अनघा नासेरी यांनी सुत्रसंचालन केले. सुप्रिया केकतपुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला दिव्यांग व त्यांचे पालक, शिक्षक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.