

प्रिय दीदी,
आज आयुष्यात माझ्या वाढदिवसाला तू माझ्यासोबत नाहीस. तू नाहीस , तुझ्या शुभेच्छा नाहीत. तुझी आज काही फर्माईश पण नाही. आशा आज तू मस्त बिर्याणी बनव , आशा आज’ तुझे ते मेरा कुछ सामान’ गा . पंचम आणि गुलजार ने ते गीत तुला न देता मला दिले तेव्हा माझीच खूप घालमेल होत होती. आठवतय तुला दीदी , रेकॉर्डिंग नंतर पहिल्यांदा तू ते गाणे ऐकलेस आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवलास . मला तर बाबांची आणि माई चीच आठवण झाली. दीदी आज पहिल्यांदा घरातली मोठी मुलगी झाल्याचा अनुभव येतोय पण त्याला तू नसल्याची दुःखद किनार आहे.
दीदी , तुझा हिमालया एवढा उत्तुंग पराक्रम . भाषा , शब्द, संगीत, सुर ह्यांना तू नवीन अर्थ दिलास. काही गाणी तुझीच होती आणि मी फक्त तुझीच साधना करीत होते .’ए मेरे वतन के लोगो’ साठी दूसरा गळा ? शक्यच नाही. मलाही कधी तरी असूया वाटायची ,नाही अस नाही पण त्या असूयेमुळे मी मलाच घडवत गेले. वटवृक्षाच्या सावलीत चिमुकल्या झाडांची वाढ खुंटते असे म्हणतात ,पण मंगेशकरांच्या वडाखाली अनेक मोगरे फुलले , अनेक चाफे बहरले, अनेक मोर नाचले. दीदी तात्यांच्या ‘ने मजसि ने’ च्या वेळची तुझी जिद्द ,तो पुढाकार . हृदययनाथ आणि तू भारावलेले. आम्ही तिघी स्तब्ध . पण कोरस किती आखिव रेखीव असावा हे तू आम्हाला शिकवलेस .
लहानपणापासून मी तशी बंडखोरच होते. नवीन काही करायचं , बदलून टाकायचं , मनाला येईल तसच करायचं. मग गाणे असो की लग्न मी न जुमानता जगत राहिले. बरेवाईट खूप अनुभव आले. पण तुझी अव्यक्त हिम्मत सतत लढायचे बळ द्यायची . अनेक व्यावसायिक मतभेद झाले, नाही असे नाही. पण कुरघोडीचे डावपेच कधीच नसायचे .
उत्तम आणि अत्युत्तम ह्या मधला तो difference of opinion होता. ओपिनियन वरुन आठवले , तुझे आणि ओपीचे उडालेले खटके आणि मी तर ओपी च्या गटातली खास होते. मग आधीच गरम तेलात अनेकानी आपले मसाले टाकले. लता विरुद्ध आशा असल्या वावड्या उठवल्या . व्यावसायिक स्पर्धेच्या आड आपल्या नात्याला गालबोट लावायचा खेळ खेळला . पण तू आणि मी मंगेशकर आहोत. एकाच झाडाच्या दोन फांद्या , सांग कसे वेगळे होणार ? तू घरातली मोठी पण त्या मोठेपणात सामावलेले कष्ट , प्रसंगी कठोर भूमिका ह्यांचे सगळे अर्थ दीदी आज तू नसताना कळतात. आज मी मोठी आहे घरात , पण ते मोठे पण नको वाटते . मी पंचम सोबत संसार पुन्हा थाटला आणि त्या वेळी तुझ्या चेहऱ्यावर बाबां सारखे कौतुकाचे भाव होते. मला तर बाबांचा स्पर्श ही आठवत नाही . पण दीदी तू मायेने हात हातात घ्यायचीस , म्हणायची , “ आशा , आज तूच सगळ बनव “ , त्या वेळेस का कोण जाणे मला त्यात बाबा दिसायचे. यंदाचे गणपती गौरी आले , पण आमची मंगेशकरांची ज्येष्ठ गौर हरवली असेच वाटले.
बाकी सगळ्या कनिष्ठ आहेतच ग , पण तो थाट नाही , तो पाट नाही . तो मंडप नाही.
वाढदिवसाच्या दिवशी रडायचं नाही ठरवले होते पण दीदी अश्रु थांबतच नाही. तुझे ‘सून्या सून्या’ कितीदा ऐकले . तू गेलीस आणि भटांचे शब्द पहिल्यांदा जिव्हारी लागले. तुला माझे ‘दम मारो दम’, ‘मोनिका ‘ सारखी गाणी ऐकायला आवडायची आणि मला तुझे ‘मोगरा फुलला’ आणि पसायदान ,
दीदी , तुझा गळा प्रार्थना , आराधना , साधकांसाठी अनमोल देणगी होती. पण माझा मानवी भावनांशी जास्त लळा . प्रेम , शृंगार , मदहोशी ,बेधुंदी मला सगळं मिळाले गायला आणि अनुभवायलाही .
दीदी बाळासाहेब , पु ल , पंचम , किशोरदा , अटलजी गेले तेव्हाची तू , पंचम नंतर तर तू पुन्हा माझी आईच झालीस, वाढते वय , तुला आणि मला आलेले संगीतमय वृद्धपण . जणू दुसरे बालपण . सगळे बांध सुटलेले सगळ्या अवघड गाठी सुटलेल्या . निर्व्याज निर्मळ पवित्र हातात हात .
तुला क्रिकेट आवडते . सुनील, सचिन ,माही अगदी काल परवाचा विराट तुला सगळेच आवडते, मला फारसा रस नाही पण रविवारी आपण हरलो पाकिस्तान सोबत . तू असतीस तर तुला खूप वाईट वाटले असते.
आज मला जरा जास्तच मोठी झाल्याचे जाणवते कारण तू नाहीस दीदी . आनंद तर आहेच पण जबाबदारी उचलायला हे खांदे मजबूत कर. तू जिथल्या मैफिलीत असशील तिथूनच मला आशीर्वाद दे , बळ दे . तुझ्या इतका नाही पण थोडा तरी तसा सूर दे.
बाकी काय आता किनारा दिसतोय. सोबतचे एक एक हात सुटले आहेत . ‘ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंगरूप ‘. त्याच भावना .मला ग्रेस ह्यांचे तू गायलेले भय इथले संपत नाही सारखे गावेसे वाटते .
मीना ,उषा ,बाळ बरा आहे . आता सगळेच दम मारो दम. दमले आहेत. सगळेच ऐंशीच्या पुढे. शरीर किती सहन करणार ? तू गेलीस पहावले नाही.तुझा तो सोहळा पाहायला सगळे आले दीदी अग तुझा लाडका सचिन पण आला .बसला , मला म्हणाला “ माझी दुसरी आई गेली” मला तर भडभडून आले.मोदीजी आले.सगळे आले .
आता एकदा माझ्या डोक्यावरून हात फिरव दीदी.मला दुसरे काहीच नको .
तुझीच लाडकी हट्टी
आशा