शाश्वत विकासाची भारतीय संकल्पना म्हणजे लक्ष्मी

0

: डॉ. रमा गोळवलकर यांचे उद्गार

: वि. सा. संघातर्फे महामहोपाध्याय कै. डॉ. वा. वि. मिराशी स्मृती दिनानिमित्त व्याखान

नागपूर (Nagpur),22 मार्च
सर्वांगीण शाश्वत विकासाची भारतीय संकल्पना म्हणजे लक्ष्मी होय. त्यासाठी शुभकारक विचारांच्या व्यक्तीचे संसाधनावर पूर्ण नियंत्रण असावे. त्याचा विनियोग करण्याचे संपूर्ण ज्ञान आणि इतरांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्याला असावे, असे उद्गार भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासिका, संशोधक व लेखिका डॉ. रमा गोळवलकर यांनी येथे काढले. विदर्भ साहित्य संघाच्या विद्वद्रत्न कै. डॉ. के. ल. उपाख्य भाउजी दप्तरी स्मृती संदर्भ ग्रंथालय आणि महामहोपाध्याय कै. डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वाचनालय ग्रंथसहवास तर्फे महामहोपाध्याय कै. डॉ. वा. वि. मिराशी स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरवर्षी विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासतर्फे या व्याख्यानपुष्पाचे आयोजन केले जाते. प्राचीन भारतीय विकास संकल्पना हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासमध्ये आज, शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.

प्राचीन भारतीय विकासाची संकल्पना मांडताना रमा गोळवलकर यांनी रोजच्या जगण्यातले विविध उदाहरण देत, संस्कृती, परंपरेचे महत्व सुरेख विवेचनाद्वारे अधोरेखित केले. दुसर्‍या महायुध्दानंतर जग त्रिभंगल्यावर जीवनशैलीतील अंतर वाढले. औद्योगीकरण, नागरीकरण आणि पाश्चातीकरणाचे अंधपणे अनुकरण करताना, युनायटेड नेशनने सांगीतलेली विकासाची संकल्पना आधीच आपल्या पुराणात होती. 2016 ते 2030 या काळात जी विकासाची उद्दीष्टे देण्यात आली आहे, त्यात ब्रँडींग फार महत्वाचे आहे. व्यक्तीच्या ब्रँडींगभोवती लक्ष्म म्हणजेच प्रतिष्ठा घुटमळते, याचा उल्लेख आठव्या शतकापूर्वीच्या ग्रंथातही काव्यात्मक पध्दतीने आढळतो, असे गोळवलकर म्हणाल्या. श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचा त्यांनी बौध्द स्तूप, हिंदू लेणी, जैन मंदिर, कंबोडियातील लक्ष्मीचे शिल्प तसेच राजा रवि वर्मांच्या पेंटींगमधून उलगडून दाखविली. आशय विश्लेषण, संवादात्मक, अर्थपूर्ण कारणमिमांसा हे त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्टय होते. गोमयात लक्ष्मी वसते, शेणाच्या वासाने नैराश्य दूर होते, म्हणून कृषीकुळाचा मान राखलाच पाहिजे. स्त्री असो वा पुरुष अ, आ, ई शिका परंतु कोंड्याचा मांडा करणे महत्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी, स्मरणात राहणारे, प्रभावी मांडणीचे उत्तम व्याख्यान, असे गौरवोद्गार काढले. व्याख्यानातील उर्जादायी आशयाचे चिंतन, मनन करुन नवीन पिढीला हा ठेवा हस्तांतरीत करावा, असे ते म्हणाले.
प्रारंभी डॉ. रमा गोळवलकर यांचे स्वागत प्रदीप दाते यांनी सन्माचिन्ह, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देउन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मृगा पागे यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रंथालयाचे संचालक प्रा. विवेक अलोणी यांनी मानले. याप्रसंगी माजी न्या. विकास सिरपूरकर, अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.