

अमरावती ग्रामीण भागात कौलारू घर दुरुस्तीची वाढली लगबग
अमरावती (Amravti)16 मे,- अलिकडे स्लॅबच्या छताच्या घराचे प्रमाण वाढले असले तरी ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागात कौलारू घरांची संख्या कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून कौलारू घरांच्या डागडुजीचे काम अनेकांनी हाती घेतले आहे. यामुळे कौलारू घर दुरुस्तीची लगबग अनेक गावांत दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्याच्या दुर्गम, ग्रामीण भागात झोपडीवजा कौलारू घरे असतात. पावसाळ्यापूर्वी या घरांच्या छताची आणि कौलांची दुरुस्ती करण्यात येते. पुढच्या महिन्यात जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे घरावर नवीन कवेलू लावणे, मोडकळीस आलेले लाकडी फाटे बसविण्याची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मातीची घरे आजही मोठ्या प्रमाणात असून, पक्क्या घरांच्या जमान्यात मातीची घरे आपले अस्तित्व टिकवून आहेत. पुढील
महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्याने जुन्या घरांच्या दुरुस्तीला वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागात माती. धाब्याची घरे दुरुस्तीसाठी घरमालकांची लगबग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात नजरेस पडत आहे. आजही जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्रासह ग्रामीण भागात वडिलोपार्जित ५० वर्षापूर्वीची मातीची घरे उभी आहेत. त्यांची प्रत्येक वर्षी गाळ- मातीसह दुरुस्ती करणे, जीर्ण लाकूड बदलण्यासह देखभाल करून मातीच्या घरांची जपवणूक बोटावर मोजण्याइतपत नागरिक करताना दिसून येत आहे.गेल्या सात वर्षापासून घराच्या छतासाठी कवेलूचा वापर बराच कमी झाला आहे. आता स्लॅबचे छत किवा टिनाचे छत तयार केले जाते. त्यामुळे पूर्वी गावात होणारी कवेलूची विक्री थंडावली आहे.
मजुरांची करावी लागते मनधरणी
■ ग्रामीण भागात अनेक कौलारू घरांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधितांची लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्ळ्याचे दिवस जवळ आल्याने पावसाळ्यापूर्वी ही कामे आटोपणे गरजेचे आहे. मात्र, कौलारू घर दुरुस्तीचा अनुभव काहीच लोकांना असल्याने संबंधित मजुरांची मनधरणी करताना घरमालकाच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे. अनेक मजुरांनी मजुरीचे दर वाढविल्याने घरमालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे