Marathi man Abbe Faria : युरोप गाजवणारा मराठी माणूस कोण होता?

0

 

(Panji)पणजीच्या मुख्य नगरचौकात एक विचित्र दुहेरी पुतळा दिसतो. उताण्या निजलेल्या एका गोवेकरीण स्त्रीला एक पुरुष संमोहित करत आहे असं ते शिल्प आहे. आजपर्यंत दहापाच वेळा तरी हा पुतळा मी बघितला असेल, पण तो कुणाचा आहे आणि का बसवला आहे याची चौकशी कधी केली नव्हती. पुढे योगायोगानेच समजलं, की तो पुतळा ऍबे फारिया नामक एका माणसाचा आहे. अधिक माहिती मिळवू लागलो तेव्हा या माणसाचं कर्तृत्व ध्यानात येऊ लागलं. लेखक, तत्ववेत्ता, धर्मगुरू, बहुभाषा कोविद, क्रांतिकारक आणि संमोहनशास्त्राचा जनक अशी या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख होती. त्याची थोडक्यात माहिती इथे देतो.

१. सोळाव्या शतकात उत्तर गोव्यातील बारदेश प्रातांत समुद्रकाठच्या कांदोली (Candolim) या गावी अनंत शेणॉय नामक एक गौड सारस्वत ब्राह्मण रहात होता. गावचा पाटील असलेल्या या अनंत शेणव्याला कालांतराने कॅथलिक ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्यात आली. अठराव्या शतकातील त्याचाच वंशज कॅटेन्नो डी फारिया याच्या पोटी ऍबे फारिया याचा जन्म झाला. जन्मतारीख ३१ मे १७५६. मूळ नांव जोस कस्टोडिओ डी फारिया. ऍबे हे त्याचं नांव नव्हे. ऍबे फारिया याचा अर्थ ‘फादर फारिया’ असा होतो.

२. पंधराव्या वर्षीच ऍबे फारिया (Abbe Faria)आपल्या बापाबरोबर रोमला गेला आणि तिथे त्याने वेदान्त (Theology) या विषयावर डॉक्टरेट मिळवली. आपला एक प्रबंध त्याने पोर्तुगालची राणी मेरी हिला अर्पण केला आणि ‘होली स्पिरिट’ या विषयावरील दुसरा प्रबंध पोप पायस (सहावा) याला अर्पण केला. तो वाचून पोप एवढा प्रभावित झाला, की ऍबे फारियाला प्रवचन देण्यासाठी त्याने ‘सिस्टिन चॅपल’ या त्याच्या निवासस्थानी पाचारण केलं. हा मोठाच सन्मान होता.

३. ऍबे फारियाची ही कीर्ती जेव्हा पोर्तुगालच्या राणी मेरीच्या कानावर गेली तेव्हा तिनेही त्याला प्रवचन देण्यासाठी निमंत्रण पाठवलं. लिस्बनमध्ये तिच्या राजवाड्यातील चॅपलमध्ये प्रवचन देण्यासाठी व्यासपीठावर ऍबे फारिया उभा राहिला, तेव्हा समोरचा प्रतिष्ठित श्रोतृवर्ग आणि दस्तुरखुद्द सम्राज्ञीला पाहून त्याची जीभ टाळ्याला चिकटून बसली. तोंडून शब्द फुटेना. त्याची ही अवस्था बघून समोरच बसलेला त्याचा बाप कोंकणी भाषेत ओरडला, “पुता, ही सोगळी भाजी रे ! कातर रे कातर ही भाजी !!” आपल्या मायभाषेतील हे शब्द ऐकताच ऍबे फारिया एकदम भानावर आला. ‘घाबरू नकोस, समोरचे श्रोते म्हणजे चक्क टाकळ्याची भाजी आहे असं समज आणि चिरायला सुरुवात कर !’ असं बापाला सुचवायचं होतं. फारियाने लगेच सुरुवात केली आणि अस्खलित पोर्तुगीज भाषेत प्रवचन देऊन सर्वांना भारावून टाकलं. ‘वाहवा !’ चा नुसता पाऊस पडला.

४. वरील प्रसंगामुळे चिंतनशील फारियाच्या विचारांना चालना मिळाली. आपल्या वडिलांनी उच्चारलेल्या मातृभाषेतील एका क्षुल्लक वाक्प्रचाराने अशी काय जादू केली असेल, की ज्यामुळे आपली मनःस्थिती पूर्णपणे बदलून गेली आणि आपण भयमुक्त झालो ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातच फारियाला संमोहनाचं (Hypnotism) तंत्र लक्षात येत गेलं. केवळ आकर्षण किंवा एकाग्रता नव्हे; तर आज्ञा, स्वयंसूचना, प्रेरणा हे घटक संमोहित करण्यासाठी किंवा संमोहित होण्यासाठी महत्त्वाचे असतात अशी त्याची खात्री पटली. पुढल्या काळात भारतीय योगसाधनेचा उपयोग करून पॅरिसमध्ये त्याने संमोहनाचा शिस्तबद्ध सिद्धांत तयार केला. या सिद्धांताला जगभर मान्यता मिळाली आणि फ्रान्झ अँटोन मेस्मर (१७३४-१८१५) याची ‘मेस्मरिझम थिअरी’ कालबाह्य समजली जाऊ लागली. ‘ऑन द कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन द स्टडी ऑफ द नेचर ऑफ मॅन’ हे या विषयावरील फ्रेंच भाषेतलं ऍबे फारियाचं गाजलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाची नंतर सर्व युरोपियन भाषांमध्ये भाषांतरे झाली. अर्थात ही ऍबे फारियाच्या उत्तरायुष्यतील घटना आहे.

५. रोम आणि लिस्बन गाजवून फारिया बापलेक गोव्यात परतले आणि चर्चचे पाद्री म्हणून काम करू लागले. पोर्तुगीजांचे अत्याचार आणि वंशभेद यांचा पदोपदी त्यांना अनुभव येत होता. अखेर १७८७ साली त्यांनी पोर्तुगीज सत्ता उलथवून टाकण्याचं कारस्थान रचलं. हे कारस्थान गोव्याच्या इतिहासात ‘पिंटोंचे बंड’ (Pinto Revolt) या नांवाने प्रसिद्ध आहे. फ्रेंचांची आणि टिपू सुलतानाची मदत घेऊन गोव्यातील पोर्तुगीज सत्ता उखडून टाकायची योजना आखण्यात आली. संबंधितांनीही त्याला मान्यता दिली आणि बंडाचा दिवसही नक्की करण्यात आला. पण साष्टी (Salcette) गावच्या एका कॅथलिक बेकरीवाल्याने फितुरी केली आणि कट उजेडात आला. त्याबरोबर ४७ लोकांची धरपकड करण्यात आली. त्यापैकी १५ जणांना पणजीतील आजच्या जीपीओ चौकात फासावर लटकवण्यात आलं. उरलेल्यांना लहानमोठ्या शिक्षा झाल्या.

६. बंड फसल्यावर ऍबे फारिया निसटून पॅरिसमध्ये गेला. फ्रान्समध्ये १७८९ ते १७९९ या काळात झालेली फ्रेंच राज्यक्रांती सुप्रसिद्धच आहे. या क्रांतीकार्यात ऍबे फारियाचा मोठा सहभाग होता. पॅरिसमधील एका क्रांतीदलाचा तो प्रमुख होता. राजा आणि राणीला मारून फ्रान्समध्ये जे पहिलं ‘बदनाम’ लोकसत्ताक स्थापन झालं होतं, ते १७९५ साली उलथवून लावणाऱ्या दहा फ्रेंच पुढाऱ्यांमध्येही ऍबे फारियाचा समावेश होता. पुढे १७९७ मध्ये याच धामधुमीच्या काळात कुठल्याशा कारणावरून त्याला मार्सेलिस इथे अटक झाली आणि कुप्रसिद्ध शतोदीफ (Chateau d’If) तुरुंगातील एकांत कोठडीत काही वर्षे त्याला बंद करण्यात आलं.

७. तुरुंगातून सुटका झाल्यावर ऍबे फारिया पुन्हा पॅरिसला आला. तिथे लेखन-संशोधनात तो मग्न राहिला. १८११ साली फ्रान्स विश्वविद्यालयात तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमला गेला. निमेस आणि मार्सेलिस या शहरांमधले हजारो मनोरुग्ण त्याने मानसोपचार करून बरे केले. त्यामुळे कालांतराने मार्सेलिस येथील मेडिकल सोसायटीचा सदस्य म्हणून तो निवडला गेला. ३० सप्टेंबर १८१९ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पॅरिसमध्ये त्याचा आकस्मिक अंत झाला.

८. आज पॅरिसच्या राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयात ऍबे फारियाचं अधिकृत तैलचित्र जतन करून ठेवलं आहे. लिस्बन आणि मडगांव या शहरांमधील रस्त्यांना त्याचं नांव देण्यात आलं आहे. त्याची २५० वी जयंती पोर्तुगालमध्ये मोठ्या इतमामाने साजरी करण्यात आली होती. डॉ. अँटोनियो इगॅस मॉनिझ (१८७४-१९५५) या नोबेलप्राप्त शास्त्रज्ञाने १९५० साली त्याच्यावर एक प्रबंध सादर केला व तो जगभर गाजला. त्याचं कांदोली गावातील ‘पिंटो हाऊस’ हे घर आजही शाबूत असून गोवा सरकारने त्याचं अनाथाश्रमात रूपांतर केलं आहे. फ्रेंच कादंबरीकार अलेक्झांडर डयूमा याने ‘दी काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ या त्याच्या सुप्रसिद्ध कादंबरीत ‘ऍबे फारिया’ याच नावाचं एक महत्त्वाचं पात्र त्याच्यावरून रेखाटलं आहे. अशा या जगप्रसिद्ध कोंकणी मराठी माणसाची महाराष्ट्राला गंधवार्ताही नसावी हीच आमची लज्जास्पद सांस्कृतिक व ऐतिहासिक शोकांतिका आहे. या लेखाने तरी त्याचं अल्प परिमार्जन व्हावं ही अपेक्षा.

हर्षद सरपोतदार (Harshad Sarpotdar)